

NCP-Congress Merger News : राज्यात एकनाथ शिंदेंच्या टायगर ऑपरेशनमुळे खळबळ उडाली असून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर फुटल्यानंतर आता आणखी एक आमदार शिवसेनेच्या वाटेवर असल्याचा दावा केला जात आहे. या दाव्यानंतर आता पुन्हा एखदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
नुकताच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी, विलिनीकरणाबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु असल्याचे सांगितले. यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळं तर्क-वितर्क लढवले जात असतानाच काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचे वक्तव्य समोर आले आहे. यामुळे विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
काँग्रेस आमदार नाना पटोले यांच्याकडून, शरद पवारांकडून राष्ट्रवादी विलिनीकरणाचा प्रस्ताव आधीच देण्यात आला होता. पण तो काही कारणास्तव विलंब झाला असा दावा करण्यात आला. त्यानंतर आमदार विजय वडेट्टीवार यांनी देखील (ता.30 जून) विलिनीकरणाच्या चर्चा सुरु असल्याचे वक्तव्य विधिमंडळात पत्रकारांशी बोलताना केले.
वडेट्टीवार यांनी, शरद पवारांचा पक्ष हा सेक्युलर विचारांचा पक्ष असून भाजपबरोबर गेलेली राष्ट्रवादी आता सेक्युलर नाही. जे धर्मांध शक्तीबरोबर जातात ते सेक्युलर असू शकत नाहीत, फुले-शाहू-आंबेडकर मानणारे असू शकत नाहीत, अशी टीका केली. तसेच शरद पवार हे सेक्युलर विचारांसाठी काम करत असून त्यांचे विचार काँग्रेसशी मिळते-जुळते आहेत. यामुळे विलिनीकरणाबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु असून हायकमांड देखील चर्चा करत आहेत, याचे सकारात्मक परिणाम येतील असे ते म्हणाले होते.
यामुळे राज्यासह राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली असतानाच आता काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी मुंबई Tak च्या मुलाखतीत मोठं वक्तव्य केलं. त्यांनी, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विलिनिकरणाचा निर्णय झाला, तर महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ते अत्यंत चांगलं ठरेल आणि हे विलिनीकरण म्हणजे दुधात साखर पडल्यासारखं असेल, असे भाष्य केलं.
महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात संघर्ष करताना दिसत असू ती एकत्र आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न असोत, इतर महत्वाचे प्रश्न किंवा विधीमंडळातील आवाज आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र असतात. तर जनता महायुती सरकारवर प्रचंड नाराज असून जनतेला सक्षम पर्याय हा महाविकास आघाडी असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान आता काँग्रेस नेत्याकडून होणाऱ्या विलिनीकरणाच्या दाव्यावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी या चर्चा आणि विलिनीकरणाचा दावा फेटाळून लावला आहे. तसेच त्यांनी, काँग्रेसकडून कधीच विलिनीकरणाचा प्रस्ताव आला नाही, प्रस्ताव आला असता तर वरिष्ठांकडून माहिती देण्यात आली असती असे त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.