Dhangar Samaj Reservation : राज्यातील धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे. बारामतीत गेल्या चार दिवसापासून धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणीसाठी युवकाचे बारामती प्रशासकीय भवनासमोर आमरण उपोषण सुरू आहे. त्याला पाठिंबा दर्शविण्यासाठी महाराष्ट्रातील एकाही नेत्याला गोविंद बागेत येऊ देणार नाही. त्यासोबतच येत्या काळात भाजपच्या नेत्यांना देखील बारामतीत फिरू देणार नाही, असा इशारा आक्रमक झालेल्या धनगर समाजाने दिला.
धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणीसाठी चंद्रकांत वाघमोडे यांचे बारामती प्रशासकीय भवनासमोर आमरण उपोषण सुरू आहे. त्यास राज्यभरातील गावागावातून धनगर समाजाचा पाठिंबा मिळत आहे. रविवारी उपोषणस्थळी धनगर समाज बांधव एकत्रित झाले होते.
यावेळी धनगर समाजाच्या वतीने सुरु असलेल्या उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी दिवाळी पाडव्याला बारामतीमध्ये गोविंद बागेसमोर आलेल्या एकाही महाराष्ट्रातील नेत्याला बारामतीत येऊ देणार नाही, असा आक्रमक इशारा या युवकांच्या वतीने देण्यात आला आहे.
आरक्षणाची लढाई जिंकण्यासाठी एकजुट हवी
दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने बारामतीमधील गोविंद बागेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भेटण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून नेतेमंडळी येतात, त्यांना रोखण्याचे काम आपण सर्वानी एकजुटीने केले पाहिजे. धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, हा आरक्षणाची लढाई जिंकण्यासाठी सर्वांनी एकजुटीने आंदोलनात सहभागी व्हायला हवे, अशी प्रतिक्रिया सकल धनगर समाजातील युवक अभिजित देवकाते यांनी दिली.