ED Mumbai Office Fire: 'हास्य'नामा : ‘ईडी’चे ‘अग्निदिव्य’ अन् नेत्यांची सुटका?

ED Mumbai fire incident, documents destroyed: मुंबईतील सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयाला आग लागल्याने आरोप-प्रत्यारोपांचे जणू रानच पेटले. ‘ईडी’च्या धाकानं धास्तावलेल्या काही नेत्यांना या आगीत आपल्याविरुद्धचे पुरावे जळाले पाहिजेत, असे मनोमन वाटू लागले. पण यामागे काही तरी कट असल्याची प्रतिक्रिया ते देऊ लागले. मात्र, एकांतात दोघा नेत्यांत रंगलेला हा संवाद आम्ही चोरून ऐकला. तो असा
ED Mumbai Office Fire
ED Mumbai Office FireSarkarnama
Published on
Updated on

अभय नरहर जोशी

‘ईडी’ग्रस्त नेता १ (गोंधळलेली अवस्था) : अहो आबूराव त्या ‘ईडी’च्या कार्यालयाला आग लागली, ही खबर आपल्यासाठी चांगली की वाईट काही समजंना झालंय. ‘

ईडी’ग्रस्त नेता २ : अहो बाबूराव, त्या ‘ईडी’चं काही खरं नाही. ते आता आमच्याकडचे पुरावे जळाले, अशा बोंबा ठोकून पळवाट शोधायला मोकळे.

आबूराव : अरे पण ही खबर आपल्यासाठी चांगली नाय का. आपल्याविरुद्धचे पुरावेच जळाले तर मग आपले गुन्हे सिद्ध कसे होणार?

बाबूराव : अहो त्याच्या‘कॉप्या सेव्ह’ करून ठेवल्या असतील की दुसरीकडे. मग काय उपयोग.

आबूराव (वैतागून) : अरे जरा तरी शुभ बोल की. ‘डिजिटल कॉप्या’ असतील तरी ‘ओरिजिनल’ कागदपत्रे तर जळाली असतील ना.

बाबूराव : खरंय राव तुमचं म्हणणं. जळो ती ‘ईडीपिडा’ असंच वाटतंय.

आबूराव : पण तुम्हाला काय वाटतंय? कुणी ही आग लावली असेल की ती लागली असेल?

बाबूराव : अहो, ती आग लागलीच असेल. कारण अनेकांवर ईडीने लावलेले आरोप एवढे स्फोटक होते, की ते एकत्र ठेवल्यानं आपोआप आग लागली असेल .

आबूराव : हो ना. असंच असेल. पण बघा ना. आपण कुठे तोंड काळं केलंय, हे या ‘ईडी’ला जगासमोर मांडायची घाई झाली होती ना. पहा आता त्यांच्या ऑफिसलाच आग लागून त्यांचंच तोंड काळं झालंय.

बाबूराव : शेवटी देवालाच आपली काळजी. त्यांनी आग लावून आपली सुटका केली म्हणायची. उस के घर में देर है पर अंधेर नहीं है...

ED Mumbai Office Fire
Pratap Sarnaik: नेत्यांचा फिटनेस : व्यायाम, आहार, वेळा यात तडजोड नको...सरनाईकांचा असा आहे फिटनेस फंडा

आबूराव : याला म्हणतात खऱ्या अर्थानं अग्निदिव्यातून जाणं.

बाबूराव : यालाच आताच्या काळात ‘क्लीन चीट’ म्हणत असावेत बहुतेक. आबूराव : राव हे बरंय की. आधी ‘चीट’ करायचं आणि नंतर ‘क्लीन चिट’ मिळवायची. द्या टाळी.

बाबूराव : आता ‘ईडी’च्या या आगीविषयी पुन्हा आपण जाहीर चिंता व्यक्त करू. चौकशीची मागणी करू. ईडीच कशी दोषी आहे, यावर आपणच आरोपांचा आगडोंब उसळवून देऊ म्हणजे जनतेला आपल्या निःपक्षपातीपणाची खात्री पटेल.

आबूराव : हो ना. आपण या प्रकरणात कसे पोळलो आहोत अन् कसे तावून सुलाखून निघालो आहोत, हे आपल्या मतदारांना-जनतेला आणि श्रेष्ठींना पटवून द्यावंच लागेल.

बाबूराव : अरे ही आगीची बातमी कळल्यापासून बाहेरच्या राज्यांतील ईडीमुळे गाडे अडकलेल्या आपल्या पक्षातील नेत्यांचे फोन येऊ लागलेत राव. म्हणतायत आग लावण्याची आयडिया कुणाची? तुम्ही सुटलात राव. आमच्या नशिबाला मात्र आग लागलीये. आमच्या इथे काही आगबिग कशी लागत नाही ‘ईडी’च्या कार्यालयाला.

आबूराव : त्यांना सांगायचं ना की महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. तेथे अशी सक्तवसुली संचालनालयाचीसुद्धा सक्तवसुली चालत नाही. त्यात आपल्यासारख्या निष्कलंक (बाबूरावांना ठसका लागतो) नेत्यांवर असे खोटे आरोप लावल्याने अवघे ईडी कार्यालयच धुमसू लागले.

बाबूराव : खरंय राव तुमचं. साप साप म्हणून भुई धोपटण्याचाच हा प्रकार आहे. नुसता आरोपांचा धूर करायचा. आपल्यावरील या खोट्या आरोपांमुळेच ईडी कार्यालयातून धूर निघाला.

आबूराव : अहो, असं काही बोलू नका बाबूराव. कुठे तरी आग लागते म्हणूनच धूर निघतो म्हणतात. असल्या बोलण्यानं आपण अडचणीत यायचो.

बाबूराव : बरं बाबा. नकोच या आगीशी खेळायला.

आबूराव : का हो बाबूराव. त्या आपल्या विरोधी गटातील शिरपतरावाचा पुरावा जळला असेल का हो?

बाबूराव : काय माहीत राव. तुम्ही म्हणता ते खरंय. त्याचे पुरावे जळता कामा नये. आपले मात्र जळावेत.

आबूराव : हो ना राव. आपल्या निवडणुकीतील यशावर लै जळत होता. जळत रहा म्हणावं. पण नंतर आपल्याला ‘ईडी’नं अडकवल्यानंतर त्यानं फटाके फोडले होते. पण नंतर पण त्याच्या विरोधात जेव्हा ‘ईडी’ने पुरावे जमा करून अडकवलं तेव्हा मात्र त्याच्या कानामागे चांगलाच जाळ निघाला.

बाबूराव : हो ना राव. याबाबत आपल्याला असंही म्हणता येणार नाय की आग लागो शिरपतरावाच्या पुराव्यांना. त्याचे पुरावे सहीसलामत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. (तेवढ्यात त्यांचा मोबाईल खणखणतो) थांबा कुणाचा फोन आहे पाहतो...(फोनवर पलीकडून जे ऐकतात त्यामुळे एकदम कपाळावर हात मारतात आणि मटकन खाली बसतात)

आबूराव : अहो काय झालं बाबूराव?

बाबूराव : अहो त्या ‘सीएम’ सायबानं डिक्लेअर केलंय, सगळी कागदपत्रे सहीसलामत आहेत. त्याची मूळ कागदपत्रे अन् ‘डिजिटल कॉप्या’ ईडीच्या दुसऱ्या कार्यालयात आहेत. त्या कार्यालयात फक्त ‘झेरॉक्स कॉप्या’ होत्या म्हणे...

आबूराव (संतापून) ः अरे आग लागो त्या ‘ईडी’आग्यावेताळाला...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com