

Uddhav Thackeray Eknath Shinde case verdict date : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण पक्षचिन्हावरून सुरू असलेली उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील कायदेशीर लढाई आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरे यांच्या बाजूने अंतिम युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या बाजूने ज्येष्ठ वकिलांकडून युक्तिवाद सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी या प्रकरणाच्या संभाव्य निकालाबाबत महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला आहे.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या बाजूने ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद केला. असीम सरोदे हेही त्यांच्या बाजूने सहायक म्हणून न्यायालयीन कामकाजात सहभागी झाले होते. संपूर्ण युक्तिवादानंतर ठाकरे हे या सत्तासंघर्षात राजकीयदृष्ट्या अन्यायग्रस्त असल्याचे मत सरोदे यांनी व्यक्त केले होते.
आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ वकिलांची फौज उतरली आहे. याबाबत असीम सरोदे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे या प्रकरणातील पुढील कायदेशीर घडामोडींवर भाष्य केले आहे.
असीम सरोदे यांच्या मते, शिवसेना सत्तासंघर्षाच्या सुनावणीत एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांच्या वतीने अनेक ज्येष्ठ वकील युक्तिवाद करणार आहेत. ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल हे मुख्यतः शिंदे गटाची बाजू मांडतील, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्यासोबत ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी, मनिंदर सिंग, महेश जेठमलानी आणि हरीश साळवे हेही युक्तिवाद करण्यासाठी सहभागी होण्याची शक्यता असल्याचे सरोदे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. याशिवाय घटनात्मक पदांवरील व्यक्ती आणि निवडणूक आयोगाच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी यापूर्वी विविध टप्प्यांवर युक्तिवाद केला आहे. त्यामुळे पुढील सुनावणीत त्यांचीही भूमिका असण्याची शक्यता सरोदे यांनी व्यक्त केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे नियमित कामकाज संपल्यानंतर या प्रकरणाची सुनावणी साधारण दुपारी 3 वाजता सुरू होत असल्याचे सरोदे यांनी म्हटले आहे. प्रत्येक वकिलाला सरासरी 45 मिनिटे ते एक तासाचा वेळ मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रत्येक वकिलाला सुमारे दोन तास युक्तिवादासाठी मिळाला, असे गृहीत धरल्यास आणखी 10 ते 12 तासांचा युक्तिवाद बाकी राहू शकतो. त्यामुळे सुनावणी पूर्ण होण्यासाठी आणखी साधारण दोन आठवडे लागू शकतात, असा अंदाज असीम सरोदे यांनी व्यक्त केला आहे.
युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाला निर्णय देण्यासाठी काही आठवड्यांचा कालावधी लागू शकतो, असे सरोदे यांनी म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा निकाल सप्टेंबरच्या अखेरीस किंवा ऑक्टोबरमध्ये येण्याची शक्यता असल्याचा त्यांचा अंदाज आहे. त्यामुळे सप्टेंबरच्या अखेरीस आणि ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी होऊ शकतात, असे भाकीत असीम सरोदे यांनी केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.