मुंबई : राज्यात काल शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झाला, तर दुसरीकडे बिहारमध्ये भाजपची सत्ता गेली. आमदारांचा दबाव वाढत असल्याने नितीश कुमारांनी भाजपची साथ सोडत इतर पक्षांच्या मदतीने तख्तापलट केला. या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपवर निशाणा साधला. (Bjp)भाजप मित्र पक्षांना संपवण्याचे राजकारण करतो अशी टीका पवारांनी केली.
यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी देखील प्रत्युतर देत शिवसेनेनेच भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला होता. आज खरी शिवसेना आमच्यासोबत आहे आणि आमच्या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार देखील काल झाला. त्यामुळे पवारांनी टीका केली असली तरी त्यांचे खरे दुःख वेगळे आहे, असा चिमटा फडणवीसांनी काढला.
बिहारमध्ये आज सत्ता गेली असली तरी पुन्हा भाजपची सत्ता येईल असा विश्वास देखील त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना व्यक्त केला. शिंदे-फडणवीस सरकारचा रखडलेला मंत्रीमंडळ विस्तार काल तब्बल ४१ दिवसांनी पार पडला. दोन्ही बाजूच्या प्रत्येकी ९ अशा १८ मंत्र्यांनी काल शपथ घेतली. या मंत्रीमंडळात एकही महिला प्रतिनिधी नसल्याबद्दल सरकारवर टीका होत असतांनाच बिहारमध्ये राजकीय उलथापालथ झाली.
याचा थेट संबंध हा राज्यातील शिवसेनेचे बंड आणि त्याला भाजपने दिलेली फूस याच्याशी जोडला जात आहे. अशाचवेळी शरद पवारांनी भाजपवर मित्रपक्ष संपवत असल्याचा आरोप केला. बिहारमधील ताज्या घटनेचे उदाहरण त्यांनी माध्यमांशी बोलतांना दिले. यावर फडणवीसांनी देखील पवारांना टोला लगावत खडेबोल सुनावले.
फडणवीस म्हणाले, मुळात राज्यात शिवसेनेनेच भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला होता. आता खरी शिवसेना आमच्यासोबत आहे, काल जो मंत्रीमंडळ विस्तार झाला तो खऱ्या शिवसेनेसोबत होतो. त्यामुळे पवार साहेबांचे दुःख वेगळे आहे. राहिला प्रश्न बिहारमधील राजकीय घडामोडींचा तर तिथे देखील नितीश कुमारांच्या जेडीयू पक्षाला फक्त ४२ जागा असतांना आम्ही त्यांना मुख्यमंत्री केले. कारण भाजपने त्यांना तसा शब्द दिला होता.
आम्ही मित्रपक्षाला दिलेला शब्द पाळतो, धोका देत नाही हे तेव्हा सिध्द झाले होते. मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्यासोबत आलेल्या आमदारांच्या, पक्षाच्या चिन्हावरून देखील अनेक प्रश्न उपस्थितीत केले जातात. पण शिंदे यांचीच शिवसेना खरी शिवसेना आहे, यासाठीचा न्यायालयीन लढा मुख्यमंत्री लढतायेत. शरद पवारांनी पक्ष बदलला तेव्हा कायदे नव्हते. आता कायदे आहेत आणि मुख्यमंत्री कायद्याने लढत आहेत, असा टोला देखील फडणवीसांनी यावेळी लगावला.
डीजीटल मिडियावर टीका करतांना फडणवीसांनी त्यांच्या विश्वासहर्तेवरच प्रश्नचिन्ह उपस्थीत केले. माध्यमाचे स्वरूप बदलते आहे, डिजिटल माध्यमाच्या विश्वासहर्ते बाबत शंका आहे. या माध्यमांची दुनियाच वेगळी झाली आहे, सत्य पोहचवणे हे त्यांचे काम असल्याचेही फडणवीस म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.