
Congress : महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष हा आजवर नेहमीच प्रस्थापित नेत्यांच्या हाती राहिला. काही मोजके नेतेच कायम निर्णय प्रक्रियेत राहिले. पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर प्रदेशाध्यक्षपदावरून नाना पटोले यांना हटवण्यात आले. पण त्यांच्या जागी फार काही वेगळ्या नेत्याची निवड होईल असे कोणाच्या ध्यानी मनी नव्हते. एखाद्या ज्येष्ठ नेत्याला किंवा प्रस्थापित घराण्यातील नेत्यालाच ही खुर्ची दिली जाईल असे समजले गेले. पण हर्षवर्धन सपकाळ या चर्चेत नसलेल्या, लाईमलाईटपासून दूर असलेल्या नेत्याची प्रदेशाध्यक्षपदावर निवड झाली.
जी स्थिती राज्य पातळीवर होती तीच जिल्हा पातळीवर. आजही अनेक पदाधिकारी वर्षानुवर्षे एकाच खुर्चीला चिकटून बसले आहेत. त्यांच्या कार्यक्षमतेचा परिमाण थेट पक्षाच्या कामगिरीवर झाला, जिल्ह्याजिल्ह्यांमधील काँग्रेसची ताकद घटली. पण याच हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेस पक्षाला नवी ऊर्जा आणि बळ देण्यासाठी मास्टर प्लॅन तयार केला आहे. या प्लॅनमुळे अनेक पदाधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखविला जाऊ शकतो. शिवाय कर्मठ व निष्ठावान कार्यकर्त्यांना या पदांवर संधी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्षात संघटनात्मक बदलांना सुरुवात केली आहे. त्यासाठी दोन दिवसांपूर्वीच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची जिल्हानिहाय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे सर्व निरीक्षक त्यांना नेमून दिलेल्या जिल्ह्यांमध्ये जाऊन पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून 15 दिवसांत प्रदेश काँग्रेसला अहवाल सादर करणार आहेत. त्यानंतर संघटनात्मक फेरबदलांच्या प्रक्रियेला सुरुवात होईल. या अहवालानंतर बहुतांश शहर व जिल्हाध्यक्षांना फेरबदलाचा दणका बसण्याची चिन्हे आहेत.
फेरबदलाच्या या प्रक्रियेत मंडल स्तरापासून प्रदेश पातळीपर्यंत काँग्रेस मजबूत करण्यासाठी आवश्यक ते बदल केले जाणार आहेत. रिक्त पदावर नियुक्त्या करण्यात येणार आहेत. तसेच जिथे आवश्यक आहे तिथे नवीन चेहऱ्यांना जबाबदारी दिली जाणार आहे. सपकाळ यांना थेट राहुल गांधी यांनीच हात दिल्याची चर्चा आहे. त्याच सपकाळ यांची कार्यशैली पाहता कुणाचा वशिला व शिफारस चालण्याची शक्यता कमीच आहे. यामुळे कर्मठ व निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये आता नंबर लागेल, याची आशा बळावली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.