Pune News : माजी मुख्यमंत्री व ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी (दि.२)संभाजीनगरच्या सभेतून भाजप, मोदी आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. यावेळी बोलताना ठाकरे यांनी मी काँग्रेससोबत गेलो तर हिंदुत्व सोडलं असेल तर मुफ्ती मोहम्मद सोबत गेल्यावर तुम्ही काय सोडलं? असा सवाल करतानाच आमचं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचं नाही. आमचं हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व आहे असा हल्लाबोला केला होता. आता त्याला हिंदू महासंघानं प्रत्युत्तर दिलं आहे.
हिंदू महासंघाचे आनंद दवे (Anand Dave) यांनी पु्ण्यात पत्रकारांशी संवाद साधताना उध्दव ठाकरेंवर खडेबोल सुनावले आहेत. दवे म्हणाले, उद्धवसाहेब, तुम्ही हिंदू धर्मातील एका जातीचा वारंवार अपमान करत आहात. शेंडी जानवंवाल्यांबरोबरच तुमचा घरोबा आहे हे विसरू नका. माझं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचं नाही असं तुम्ही वारंवार म्हणत आहात. प्रत्येकवेळेस हे वाक्य वापरता. या विधानाचा आम्ही निषेध करतो. पण हा निषेध करत असतानाच तुम्ही सुद्धा त्याच कुळातील आहात हे सुद्धा स्पष्ट करतो, असा टोला आनंद दवे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
तुमचा घरोबाच मुळात शेंडी जानव्याशी...
उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) हे वारंवार एकाच जातीचा अपमान करत आहेत. तुम्ही आमच्या जातीला टार्गेट करू नका. तुमचा घरोबाच मुळात शेंडी जानव्याशी आहे, असा टोला लगावतानाच तुमच्या घरात आलेल्या मुली आणि तुमच्या घरातून गेलेल्या मुली कोणत्या घरात गेल्या ते आठवा असा टोलाही दवे यांनी ठाकरेंना लगावला आहे.
...हे पापही तुम्ही करत आहात!
ठाकरे घरात आलेल्या मुली आणि ठाकरेंनी दिलेल्या मुली कोणत्या घरात गेल्या आहेत हे जरा आठवा. स्वतःच्या सोयरीक जाहीर करा. आत्यांची आडनावे सांगा. सूनांची, व्याहांची नावे सांगा, असं आव्हान देतानाच हिंदुत्ववादी म्हणून तुम्हाला स्वतःला सांगावं लागत आहे, सिद्ध करावे लागत आहे. हेच दुर्दैव आहे. ते करत असतानाच तुम्ही एका जातीला वारंवार बदनाम करण्याच पाप देखील करत आहात, अशी टीकाही दवे यांनी केली.
उद्धव ठाकरे वक्तव्य काय?
छत्रपती संभाजीनगरच्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत ठाकरे गटाचे प्रमुख व माजी मंत्री उध्दव ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढविला होता. यावेळी त्यांनी माझ्यावर हिंदुत्व सोडल्याचा आरोप करण्यात येतो. मला असं एक उदाहरण द्या मी पुन्हा तोंड दाखवणार नाही. मी काँग्रेस सोबत गेलो तर हिंदुत्व सोडले असेल तर मुफ्ती मोहम्मद सोबत गेल्यावर तुम्ही काय सोडले? असा सवाल करतानाच आमचं हिंदुत्व हे तुमच्यासारखं नाही. आमचं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचं नाही. आमचं हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.