Uddhav Thackeray: मैदानाबाहेरील क्रिकेट ‘सामना’! पाकिस्तान संघ ‘क्लीन बोल्ड’

India Pakistan Match Protest Shiv Sena Uddhav Thackeray: सध्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. आम्हाला क्रिकेट अन् राजकीय सामन्यांमध्ये खालीलप्रमाणे साम्यस्थळे आढळली ती आम्ही खाली विशद करण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तव राजकीय वादाबाबत आपल्याला त्यात साम्यस्थळे आढळली तर तो योगायोग समजावा...
India Pakistan Match Protest Shiv Sena Uddhav Thackeray
India Pakistan Match Protest Shiv Sena Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

अभय नरहर जोशी

सध्या आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्याच्या यष्ट्या उखडण्यासाठी हिचा  वापर होतो. निमित्त असतं भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याचं. यासाठी तुम्हाला यथेच्छ थुंकता यायला हवं. क्रिकेट सामन्यात चेंडूला थुंकी लावून तो चमकावला जातो. घासून ‘स्विंग’ करण्याचा प्रयत्न होतो. राजकीय गोलंदाजीत मात्र अख्ख्या सामन्यावर थुंकण्याची तयारी करावी लागते. अत्यंत तुच्छ चेहऱ्यानं ‘आम्ही या सामन्यावर थुंकतो...’ अशी ‘राणा भीमदेवी थाटा’ची घोषणा या राजकीय महाभारतात  ‘संजया’ला करावी लागते.

अत्यंत तीव्र वाक्‌बाणांनी हा राजकीय ‘सामना’ लढावा लागतो. यात फिरकी गोलंदाजी, मध्यम गती गोलंदाजी असले प्रकार नसतात. यात थेट वेगवान गोलंदाजी असते. बहुतेक सगळे प्रतिस्पर्ध्याचा पाय शेकवणारे ‘यॉर्कर’ किंवा शरीरवेधी म्हणजे ‘बॉडीलाइन’ असतात. आता नाही म्हणायला अधून मधून ‘फुल टॉस’ पडतो. त्याला संबंधितांचा नाईलाज असतो. अखेर हाही अनिश्चित राजकीय खेळच आहे.

फलंदाजी

यात तुमचा इतिहास पक्का असावा लागतो. त्यामुळे तुम्हाला चांगला बचाव करता येतो. इतिहास यासाठी पक्का असावा लागतो, की प्रतिस्पर्ध्याने या सामन्याआधी काय चुका केल्या आहेत याचा अभ्यास हवा. म्हणजे तुम्हाला जोरदार षटकार मारता येतो. प्रतिस्पर्धी गोलंदाजाची लाईन अँड लेंथ म्हणजेच लय बिघडवायला ते उपयोगी ठरते. मग शत्रुराष्ट्राच्या कुठल्या फलंदाजाला तुम्ही घरी बोलावून पाहुणचार केलाय, हे तुम्हा संदर्भासहित अचूक माहिती असायला हवी आहे. . त्यामुळे त्याचं संदर्भासहित स्पष्टीकरण तुम्हाला प्रतिस्पर्ध्याला मागता येते. अन् तुमचा डिफेन्स तर होतोच प्रसंगी षटकार-चौकार मारण्याचीही संधी मिळते. कधी कधी प्रतिस्पर्ध्यांनी जसे ‘पाक’कृती बंद कराव्यात’ अशी बाष्कळ कोटी केली त्यालाच उत्तर म्हणून आले‘पाक’ खाणे बंद करावे  अशी प्रतिबाष्कळ कोटी करावी. ते ऐकून जनतेचे डोके पकले तरी चालते.

India Pakistan Match Protest Shiv Sena Uddhav Thackeray
Eknath Shinde: महायुतीत एकनाथ शिंदे नाराज? पुढील काळ कसा असेल लाभदायक

यष्टिचित

यात आपल्याच बॅटनं आपलीच यष्टी उद्ध्वस्त केल्यानं फलंदाज बाद होतो. राजकीय फलंदाजी करतानाही कधी कधी असं होतं. एरवी शत्रुराष्ट्राला सिंधू करार वगैरे रद्द करून ‘जळी’, सर्जिकल स्ट्राईक करून ‘स्थळी’, जंगलात विरोध करून ‘काष्ठी’ अन् डोंगरदऱ्यांतील घुसखोरी हाणून ‘पाषाणी’- असं जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी विरोध करायचा अन् त्यांच्याशीच क्रिकेट खेळायचं. एकीकडे ऑपरेशन सिंदूर सुरूच आहे म्हणायचं अन् त्याच राष्ट्राशी सामने खेळायचे, म्हणजे आपल्याच हातानं आपल्या पायावर धोंडा मारून घेणे नव्हे काय...ही एकप्रकारे यष्टिचितच म्हणायची. 

पायचित अपील

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे चेअरमन गृहमंत्रिपुत्र वादग्रस्त क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीसह क्रिकेट सामना पाहत आहेत, असं अडचणीत आणणारी ध्वनिचित्रफित प्रसृत करण्यात आली. पायचित ठरविण्यासाठी ‘हाउज दॅट’ असं जोरदार अपीलही करण्यात आलं. पण रिव्ह्यूमध्ये स्पष्ट झाले की ती चित्रफीत ‘चॅम्पियन्स’ करंडकाची आहे. आता सुरू असलेल्या ‘आशिया करंडका’ची नाही. त्यामुळे ‘रिव्ह्यू’मधून ते पायचित झाले नसल्याचे स्पष्ट झाले अन् संभाव्य अडचणींतून त्यांची सुटका झाली.

India Pakistan Match Protest Shiv Sena Uddhav Thackeray
Shankar Mandekar: 'शोले'मुळे जिद्दीने संघर्ष करण्याची उर्मी; जनसेवेत गुंतल्याने आजाराला संधीच नाही

षटकार-चौकार

सामना सुरू होण्याआधी भारतीय अन् पाकिस्तानी कर्णधाराची नाणेफेक झाली. त्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकली. (तेवढाच विजयाचा माफक आनंद) त्यानंतर संकेतानुसार भारतीय कर्णधाराने पाकिस्तानी कर्णधाराशी औपचारिक हस्तांदोलनही केलं नाही. तो आपला हाताची घडी अन् तोंडावर बोट ठेवून तेथून निघून गेला.

विजयी षटकार मारल्यानंतरही भारतीय कर्णधारानं आपल्या जोडादारासह पाकिस्तानी क्रिकेटपटूंशी हस्तांदोलन केलंच नाही. तो परस्पर भारतीय ‘ड्रेसिंगरूम’मध्ये निघून गेला. नंतर पत्रकारांशी बोलताना त्यानं जाहीरपणे या वर्तणुकीचं समर्थन केलं. त्यानं मारलेल्या षटकारानं या सामन्यात भारतानं विजय मिळवला अन् नंतर नाबाद राहिलेल्या कर्णधारानं आपल्या वक्तव्यानं आणखीच उत्तुंग षटकार-चौकार मारले.

त्यामुळे धाव घेण्यासाठी ‘क्रीज’ सोडून पळणाऱ्या ‘नॉन स्ट्रायकर’ फलंदाजाला जसं यष्टी उखडून ‘मांकडिंग’ केल्यावर त्याचा चेहरा होतो, तसा चेहरा पाकिस्तानी खेळाडूंचा झाला होता. ‘बूंद से गयी वो...’ किंवा ‘तेलही गेलं अन् तूपही गेलं हाती धुपाटणं आलं’ या म्हणींप्रमाणे भाव त्यांच्या मनी उमटले असतील.

क्लीन बोल्ड

अवघ्या भारतीय संघांनंच पाकिस्तानी संघांच्या खेळाडूंशी हस्तांदोलन केलंच नाही. त्यांच्याशी साधा संवादही साधला नाही. त्यामुळे हा अवघा संघच एका अर्थी ‘क्लीन बोल्ड’ झाला.

फ्री हिट!

भारत-पाकिस्तान सामन्याला राजकीय क्षेत्रात ‘नो बॉल’ ठरवून, राजकीय विरोधकांनी ‘फ्री हिट’ मारण्याची संधी घेतली. त्यासाठी किती कुंकू लागलं याचा हिशेब अजून लागायचाय. पण या कुंकवानं ‘सिंदूर’लाच जाब विचारला. या कुंकवाचा करंडा आता ‘सिंदूर’ला फिकं ठरविण्यासाठी दिल्लीवारी करणार आहे म्हणे...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com