

रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील वळके गावात एका कुटुंबाला तब्बल 10 वर्षे सामाजिक बहिष्कार टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला.
वयोवृद्ध व्यक्तीच्या निधनानंतरही अंत्ययात्रेत सहभागी होण्यास ग्रामस्थांनी फतवा काढल्याचा आरोप आहे.
मधुकर भगत यांच्या तक्रारीवरून रेवदंडा पोलिसांनी सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Raigad News : समाजातील सामाजिक बहिष्काराची प्रथा मोडीत काढण्यासाठी राज्य सरकारकडून कडक कायदे करण्यात आले आहेत. मात्र हे कायदे कागदावरच आहेत की काय असा प्रश्न आता रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील घटनेमुळे विचारले जात आहेत. येथील वळके गावात एका कुटुंबाला तब्बल दहा वर्षे समाजाने वाळीत टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक म्हणजे त्या कुटुंबातील वयोवृद्ध व्यक्तीचे निधन झाल्यानंतर अंत्ययात्रेत सहभागी न होण्याचा फतवा देखील ग्रामस्थांनी काढला. यानंतर कुटुंबाने रेवदंडा पोलिसात धाव घेतल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आता पोलिसांनी पावले उचलली असून मधुकर भगत यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, वळके गावातील समाज मंदिरात लोकांनी त्यांच्या कुटुंबाला बेकायदेशीरपणे वाळीत टाकले. ही घटना 2016 मध्ये घडली असून ती आत्तापर्यंत सुरू होती. तर मधूकर भगत यांनी गावातील महिलांच्या संबंधीत अन्यायकारक निर्णय, गाव पंचांचे दंड, वर्गणी, फंड आणि बेकायदेशीर वसुलीस विरोध केल्यानेच गावाने वाळीत टाकले. फक्त वाळीतच टाकले नाही तर सामाजिक बहिष्कार करत दहा वर्षांचा कालावधी देखील सुनावण्यात आला.
त्याचबरोबर कुटुंबाचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी प्रत्येकी 5000 रुपये दंड आणि 1000 रुपये व्याज अशी रक्कम वसूल करण्याचा दबावही टाकण्यात आल्याचे मधुकर भगत यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर अंत्यविधीस गावकऱ्यांनी सहभागी होऊ नये, असा फतवा देखील काढण्यात आला. तर जे कोणी ग्रामस्थ अंत्यविधीस जातील त्यांनाही बहिष्कृत केले जाईल, असा इशारा देण्यात आला होता.
हा इशारा झुगारून काही काही नागरीक त्यांच्या वडिलांच्या अंत्यविधीत सहभागी झाले. त्यांना देखील प्रत्येकी 5000 रुपये दंड ठोठावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फक्त दंड लावला नाही तर चंद्रकांत भगत व राहुल काटकर यांच्याकडून 10,000 रुपये प्रत्यक्ष वसूल केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. तर धनंजय धनावडे यांनी दंड न दिल्याने त्यांच्यावर देखील बहिष्कार टाकण्यात आल्याचे फिर्यादीत दावा करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल
या धक्कादायक प्रकारानंतर आता वदंडा पोलिसांनी शंकर कमळ्या सावंत, गोपीनाथ सहदेव म्हात्रे, सुधाकर धनंजय भगत, राजेंद्र गणपत भगत, कमळाकर तुकाराम पाटील, किसन धर्मा म्हात्रे, शरद महादेव म्हात्रे, अनंता कमळ्या धोत्रे, कमलाकर महादेव म्हात्रे, भारत लखमा सावंत, राजीबाई महादेव भगत, निर्मल जनार्दन भगत, कुसुम गजानन म्हात्रे, सुधीर गंगाजी सावंत, नारायण चांगु वाजंत्री, जनार्दन रामा भगत, लीलाधर लक्ष्मण काटकर, अनिल मधुकर धनावडे, नथुराम सुदाम धनावडे, आत्माराम वामन म्हात्रे, सुभाष हाशा सावंत, अमोल मनोहर भगत, शंकर पद्माकर भगत, जनार्दन नागू म्हात्रे, राजेंद्र धर्मा पाटील, हरिश्चंद्र रामा म्हात्रे, किसन धर्मा म्हात्रे, महादेव नागू भगत, हरिचंद्र झिटू म्हात्रे, अरुण मधुकर धनावडे यांच्या विरोधात तक्रार दाखल करून घेत गुन्हा नोंद केला आहे.
1. ही घटना कुठे घडली आहे?
रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील वळके गावात.
2. कुटुंबावर किती काळ सामाजिक बहिष्कार होता?
सुमारे दहा वर्षे.
3. ग्रामस्थांनी नेमका कोणता प्रकार केला?
अंत्ययात्रेत सहभागी न होण्याचा फतवा काढण्यात आला.
4. या प्रकरणी पोलीस कारवाई झाली आहे का?
होय, रेवदंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
5. कोणत्या कायद्याअंतर्गत कारवाई होऊ शकते?
महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई होऊ शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.