

उरणमध्ये मनसे पदाधिकारी सतीश पाटील यांना भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून आईसमोर मारहाण केल्याचा गंभीर आरोप झाला आहे.
मारहाणीनंतर पाटील यांना महेश बालदी यांच्या विरोधात बोलल्याबद्दल जबरदस्तीने माफी मागायला लावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
या घटनेमुळे उरणमध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय तणाव निर्माण झाला असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Uran Political News : रायगडमध्ये नुकताच मतदान पार पडले असून शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीत जोरदार राडा झाला होता. ज्यानंतर मंत्री भरत गोगावलेंच्या मुलग्यासह अनेकांवर गुन्हे दाखल झाले होते. यामुळे येथील राजकीय वातावरण तंग झाले आहे. अशातच भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून मनसेच्या नेत्यावर हात उचलण्यात आला असून त्याला त्याच्या आई समोरच मारहाण केली आहे. दरम्यान काहीच दिवसांपूर्वी महाडमध्ये देखील अशाच पद्धतीने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे शहरप्रमुखावर हल्ला केला होता. यामुळे आता रायगड महाराष्ट्रात की बिहारमध्ये? असा सवाल उपस्थित केला जात असून एकच खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून शिंदेंच्या शिवसेनेनंतर आता भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केली आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे शहरप्रमुख पंकज उमासरे यांच्यावर हल्ला केला होता. ज्यानंतर माजी सभापती सपना मालुसरे यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण शांत होत नाही. तोच ऐन मतदानादिवशी शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या स्नेहल जगताप यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला होता. वाहनांची तोडफोड करण्यासह ड्रायव्हरला मारहाण करण्यात आली होती.तर भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावलेंसह अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. सध्या या प्रकरणाची राज्यभर जोरदार चर्चा सुरू आहे.
यादरम्यान आता उरणमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. ही घटना गुरुवारी रात्री घडली असून धक्कादायक म्हणजे, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे कार्यकर्ते सतीश पाटील यांना त्यांच्या आईसमोरच मारले आहे. भाजपचे काही पदाधिकाऱ्यांनी सतीश पाटील यांच्यांसह त्यांच्या आईला देखील धक्काबुक्की करत अश्लील शिवी गाळी केली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरला झाला आता खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, गुरुवारी रात्री मनसेचे पदाधिकारी सतीश पाटील आणि त्यांची आई दत्त जयंतीनिमित्त बाहेर पडले होते. ते दर्शन घेवून घरी जात असताना येथील द्रोनागिरी बाजारात आले असताना भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांची अडवणूक केली. तसेच त्यांच्या आईला अश्लील शिवी गाळी करत उरणचे स्थानिक आमदार महेश बालदी यांची माफी माग अन्यथा तुला संपवू अशी धमकी देत मारहाण केली. बालदी यांची जबरदस्तीने माफी मागायला लावली आहे.
पाटील यांनी काही दिवसांपूर्वी बालदी यांच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतरच त्यांना मारहान झाल्याचं येथे बोललं जात आहे. तर या मारहाणीचा आणि माफी मागतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून उरणमध्ये मनसे आक्रमक झाली आहे. आरोपींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी मनसेनं केली आहे.
या संपूर्ण प्रकरणानंतर मनसेचे पदाधिकारी सतीश पाटील यांनी उरण पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्यांविरोधात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत आपण भाजपचे आमदार यांच्याविरोधात बोलल्याने ही मारहाण करण्यात आली आहे. या हल्ल्यात गळ्याची सोन्याची चैन देखील हिसकावून घेण्यात आली असून माझ्यावर राजकीय वादातून राग काढण्यात आला आहे.
त्यामुळे संबंधित आमदारांसह कौशिक शाह, गणेश पाटील, विशाल पारेकर, सनी भोईर अमन आणि अज्ञात अशा १०० ते १५० जानांविरोधात पाटील यांनी तक्रार दिली आहे. तसेच भाजप आमदारांच्या या कार्यकर्त्यांनी हल्ला करताना गणेश शिंदे यांना देखील निवडणुकीच्या निकालानंतर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावाही पाटील यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.
या तक्रारीची गंभीर दखल पोलिसांनी घेतली असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेबाबत अद्याप भाजप आमदार महेश बालदी यांची कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मात्र एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला अशाप्रकारे मारहाण करून माफी मागायला लावल्याने उरणमध्ये राजकीय तणाव वाढला आहे. या प्रकरणी आता उरण पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून अद्याप भाजप आमदार महेश बालदी यांची प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
FAQs :
मनसेचे सतीश पाटील यांना भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली असून ती त्यांची आई पाहत होती.
महेश बालदी यांच्या विरोधात भाष्य केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप आहे.
पाटील यांना जबरदस्तीने माफी मागायला लावल्याचे दृश्य व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते.
उरणमध्ये आणि संपूर्ण राजकीय वर्तुळात मोठा तणाव निर्माण झाला आहे.
तपास, तक्रारी, आणि दोन्ही पक्षांकडून राजकीय प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.