
Ratnagiri News : शिवसेना फुटीनंतर दोन पक्ष तयार झाले असून एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून विस्तवही जात नाही. अशी स्थिती सध्या राज्यभर पाहायला मिळत आहे. आता नुकताच झालेल्या विजयी मेळाव्यात देखील उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर जय गुजरातच्या घोषणेवरून जोरदार टीका केली होती. तर तळकोकणात सामंत बंधुंनी शिवसेना फोडण्यावर विशेष लक्ष दिले होते. यामुळे जिल्ह्यातील दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये वाद पाहायला मिळत आहे. अशा वादातही सामंत आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्यात भेट आणि चर्चा झाली. तर जिल्ह्यातील प्रतिष्ठीत निवडणुकही 14 ठिकाणी बिनविरोध झाल्याने याची राज्यभर चर्चा होताना दिसत आहे.
रत्नागिरी जिल्हा सहकारी बोर्डाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘सहकार पॅनेल’चा 17 पैकी 16 जागांवर दणदणीत विजय झाला. पण सध्या या विजयाची नाही तर या मागे झालेल्या पडद्यामागिल घडामोडींचीच चर्चा राज्यभर होत आहे. ही निवडणूक जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे आणि जिल्हा सहकारी बोर्डाचे विद्यमान अध्यक्ष प्रभाकर शेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. तर जिल्हा बँकेची निवडणूक सहकार पॅनेलने लढवली होती.
जिल्हा सहकारी बोर्डाच्या निवडणुकीत यंदा उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाकडून सहकार पॅनेलविरोधात उमेदवार उभे केले होते. मात्र जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, लांजा - राजापूरचे आमदार किरण सामंत आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्यात बैठक झाली. ज्यानंतर राऊत यांनी शिवसेनेचे सर्वच्या सर्व उमेदवार अखेरच्या दिवशी मागे घेतले. त्यामुळे सहकार पॅनेलचे 14 उमेदवार बिनविरोध निवडून आले.
तरीही अखेरच्या दिवशीही सहकार पॅनेलविरोधात तीन उमेदवारांनी आपली उमेदवारी कायम ठेवली होती. त्यामुळे 5 जुलै 2025 रोजी उर्वरित तीन जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान झाल्यावर लगेच मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला. जिल्हाभरातील मतदारांनी मोठ्या उत्साहात रत्नागिरीत येऊन मतदानाचा हक्क बजावला. या तीन जागांपैकी सहकार पॅनेलचे नितीन कांबळे आणि सीताराम लांबोरे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला.
या दणदणीत विजयानंतर विजयी उमेदवारांचे पालकमंत्री उदय सामंत आणि जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी अभिनंदन केले. या संपूर्ण निवडणुकीत आमदार शेखर निकम आणि दापोली अर्बन बँकेचे जयवंत जालगावकर यांचेही मोलाचे सहकार्य लाभल्याचे सहकार पॅनेलकडून सांगण्यात आले. या विजयामुळे रत्नागिरीच्या सहकार क्षेत्रावर सहकार पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
रामचंद्र गराटे, प्रभाकर शेट्ये, चंद्रकांत परवडी, रमेश दळवी, अविनाश जाधव, सिराज घारे, सुनील टेरवकर, प्रताप सावंत, प्रसन्न दामले, सुरेंद्र लाड, मनोज कदम, हेमंत वणजू, स्मिता दळवी आणि प्राची टिळेकर आणि हरिषचंद्र कालेकर हे चिट्टीवर निवडून आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.