
खेडमध्ये आरक्षणानंतर राजकीय हालचाली वाढल्या आहेत.
सभापती पदासाठी दिग्गजांमध्ये रस्सीखेच सुरू आहे.
आमदार भास्कर जाधव यांना शिवसेना टिकवण्यासाठी कठीण संघर्षाचा सामना करावा लागणार आहे.
Khed News : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी गट व गणांचे आरक्षण जाहीर झाले आहे. यानंतर आता खेड तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ पाहायला मिळत असून दिग्गजांचे सुरक्षित किल्ले डळमळले असून इच्छुकांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत. यामुळे येथे नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता असून इच्छुकांकडून देखील मोर्चे बांधणी सुरू झाली आहे.
खेड पंचायत समितीसह जिल्हा परिषदेचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले असून यामुळे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अरुण कदम यांच्यासह अनेक अनुभवी नेत्यांची कोंडी झाली आहे. दुसरीकडे शिवसेनेत इच्छुकांची भाऊगर्दी उसळल्याचे दिसत आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत दिग्गजांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत.
तालुक्यात शिवसेना म्हणजे रामदास कदम आणि रामदास कदम म्हणजे शिवसेना असे समीकरण आहे. सद्यःस्थितीत येथील राजकारण नवे वळण घेत असून, माजी आमदार संजय कदम यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे सेनेची बाजू अधिक भक्कम झाली आहे. त्यामुळे तालुक्यात नव्या समीकरणांचा उगम होण्याची सध्याची स्थिती आहे.
शिवसेनेच्या भात्यात नवे चेहरे असल्याने उमेदवार शोधण्याची शिवसेनेला हरज भासणार नाही. उलट शिवसेनेत उमेदवारीसाठी भाऊगर्दी होताना दिसत आहे. दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला पक्षाला मतदारसंघासह जिल्ह्यात लागलेल्या गळतीमुळे आता तगडे उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे.
अशावेळी आता आरक्षणामुळे दिग्गज आऊट झाले असून नवे इन झाले आहेत. ही स्थिती सध्या तालुक्यात आहे. आरक्षणातील फेरबदलामुळे होममिनिस्टर्सची नावे पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सक्षम महिला उमेदवारांच्या शोधात सर्वच पक्षात चाचपणी सुरू झाली असल्यामुळे येत्या काही दिवसात विविध पक्षात इन्कमिंग व आऊटगोइंग सुरू होणार आहे.
आरक्षणाचा फटका दिग्गजांना
खेड पंचायत समितीसह जिल्हा परिषदेचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले असून भडगाव गण मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. यामुळे माजी सभापती अरुण कदम यांचा पत्ता कट झाला आहे. तर भरणे गण हा मागास प्रवर्ग (स्त्री) साठी आरक्षित झाल्याने नव्या महिला उमेदवाराची कसोटी लागणार आहे. सुकिवली, विराचीवाडी, लोटे गटांत शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागणार असून दयाळ गट सर्वसाधारण, धामणदेवी सर्वसाधारण स्त्री झाल्याने दिग्गजांचे गण हातातून निसटले आहेत.
सभापतिपदासाठी रस्सीखेच
भरणे गण सर्वसाधारण झाल्यामुळे इच्छुकांची भाऊगर्दी उसळली आहे. हा गण परंपरेने शिवसेनेसाठी सुरक्षित मानला जातो तर भडगाव गणदेखील दिग्गजांसाठी आकर्षण ठरत असून, सभापतिपदाच्या खुर्चीसाठी या दोन्ही गणात उमेदवारीसाठी रस्सीखेच होणार आहे.
खाडीपट्ट्यात ठाकरे सेनेची कसोटी
आमदार भास्कर जाधव यांना खाडीपट्ट्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी कठीण संघर्ष करावा लागणार आहे. कारण, हा भाग गुहागर विधानसभा मतदार संघात येतो. महाविकास आघाडीसमोरील आव्हान म्हणजे अंतर्गत मतभेद व आरक्षणामुळे निर्माण झालेला असंतोष होय. तसेच गुहागर मतदार संघातील बहिरवली, विराचीवाडी, गुणदे, लोटे, आंबडस, आंजणी, धामणदेवी या गणांमध्ये शिवसेना विरूद्ध उबाठा शिवसेना अशी थेट लढत होण्याची चिन्हे आहेत. महायुतीत तडजोडीचा फॉर्म्युला ठरवताना कुठे उमेदवार द्यायचा, कुठे सोडायचा यावर मोठे राजकीय गणित जुळणार आहे.
1. खेडमध्ये रस्सीखेच का सुरू झाली आहे?
आरक्षणानंतर सभापती पदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे.
2. भास्कर जाधव कोणत्या पक्षाचे आमदार आहेत?
ते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे आमदार आहेत.
3. सभापती पदासाठी कोण दावेदार आहेत?
राष्ट्रवादीत अनेक ज्येष्ठ नेत्यांचे नाव चर्चेत आहे, मात्र अंतिम निर्णय बाकी आहे.
4. या संघर्षाचा आगामी निवडणुकांवर काय परिणाम होऊ शकतो?
या संघर्षामुळे दोन्ही पक्षांची संघटनात्मक ताकद आणि मतदारांवरील प्रभाव प्रभावित होऊ शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.