Dapoli News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. परब यांच्या मालकीच्या दापोली येथील साई रिसॉर्टवर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. बेकायदा बांधकाम केल्याने या हॉटेलवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात होती. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. हॉटेलचे बेकायदा बांधकाम पाडण्याचे काम पुण्यातील एका कंपनीला देण्यात आले असून, त्यांनी या कामाला सुरुवात केली आहे.
दापोली येथे असलेल्या साई रिसॉर्टने बेकायदा बांधकाम केले असून, यासाठी पर्यावरणाच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप भाजपचे नेते सोमय्या यांनी केला होता. हे हॉटेल ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) आणि त्यांचे समर्थक असलेले सदानंद कदम यांच्या मालकीचे असल्याचे समोर आले होते. या प्रकरणी परब आणि कदम यांच्याविरोधात दापोली पोलिस स्टेशनमध्ये नोव्हेंबर 2022 मध्ये गुन्हा दाखल झाला होता. सोमय्या यांनी वारंवार या रिसॉर्टच्या बेकायदा बांधकामाचा मुद्दा लावून धरला होता.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राजकीय सत्तेचा वापर करत पर्यावरणाच्या नियमांना बगल देत येथे परब यांनी बेकायदा बांधकाम केल्याचे सोमय्या यांनी म्हटले होते. हे गुन्हेगारी कृत्य असून, हॉटेलचे बांधकाम करताना कोस्टल रेग्युलेशन झोन (सीआरझेड) कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी कोर्टात धाव घेत कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर हे बेकायदा बांधकाम पाडण्याची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. रिसॉर्टचे मालक सदानंद कदम यांनी नुकतेच हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करून हॉटेलचा अनधिकृत आणि अतिरिक्त भाग स्वखर्चाने पाडू, असे सांगितले होते. त्यानुसार आता हे बांधकाम पाडले जात आहे.
या हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरचे बांधकाम पाडण्याचे काम सुरू झाले असून, पुढचे दोन-तीन दिवस हे काम चालणार आहे. पुण्यातील (Pune) एका कंपनीला हे काम देण्यात आले आहे. दोनच दिवसांपूर्वीच भाजपचे नेते सोमय्या यांनी एक्स वर पोस्ट टाकून पुढील दोन दिवसांतच रिसॉर्ट पाडण्याचे काम सुरू होणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर बुधवारी हे काम सुरू करण्यात आले आहे. हॉटेलचे बांधकाम पाडण्यास सुरुवात झाल्यानंतर सोमय्या यांनी एक्सवर पोस्ट टाकून याची माहिती दिली आहे. 'हिसाब तो देना पडेगा' असे म्हटले आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.