
Ratnagiri News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले होते. ज्यानंतर आठ आठ निवडणुका जिंकणाऱ्या जाधव यांना आता थांबण्याचा निर्णय घ्यावा का वाटतोय अशी शंका अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे. यावरून कोकणासह राज्यभर चर्चेची राळ उठली असतानाच त्यांनी विरोधकांवर हल्लबोल केला. तसेच आपण कोणत्याही दादा, भाईला घाबरत नाही', असेही ठणकावले आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील वातावरण तापले आहे. (Bhaskar Jadhav signals political comeback in Konkan, vows to revive Shiv Sena UBT ahead of local body elections starting with Sindhudurg)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला (Shiv Sena UBT) कोकणात पुन्हा वैभव मिळवून देण्यासाठी आपण मैदानात उतरणार असल्याचे जाधव यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. तर याची सुरूवात सिंधुदुर्गातून करणार असल्याचे जाधव यांनी चिपळूण येथे जाहीर केले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका पुढील काही महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्याचपार्श्वभूमीवर चिपळूणमध्ये एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जाधव (Bhaskar Jadhav) यांनी गुहागर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या शाखाप्रमुखांना मार्गदर्शन केले. या वेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपल्या परिसरातील प्रश्न, समस्या मांडल्या. आगामी काळात संघटना बांधणीसाठी कशा पद्धतीने काम केले पाहिजे, संघटनेत कोणत्या सुधारणा व्हायला हव्यात, याबाबत कार्यकर्त्यांनी सूचना केल्या. काही कार्यकर्त्यांनी जुन्या आठवणीही सांगितल्या, तर काहींनी विकासकामांसाठी निधीची मागणी केली. कार्यकर्त्यांचे मनोगत ऐकल्यानंतर आमदार जाधव यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले.
निवडणुकीच्या काळात आपले शाखाप्रमुख झोपून राहतात. पदावरून काढल्यानंतर ते जागे होतात आणि मातोश्रीवर तक्रार करतात अशा तक्रारींचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. विधानसभा निवडणुकीत आपले शाखाप्रमुख जागरूक असते तर माझे मताधिक्य वाढले असते. मतदारसंघात एवढी कामे केली लोकांच्या सतत संपर्कात राहिलो तरी आपले मताधिक्य कमी झाले.
लाडकी बहीण योजनेचा फारसा परिणाम झाला नसता. कार्यकर्ते चार प्रश्न सांगतात. त्यातील तीन सोडवले आणि एक सोडवला नाही तर नाराज होतात. आता घाबरायचे नाही. पुनःश्च एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांवर आपला भगवा फडकविण्याच्या इर्षेने आपण कामाला लागायचे आहे. त्यासाठी संघटना बांधणी अत्यंत महत्वाची आहे. प्रत्येक शाखेतील शाखाप्रमुख ते गटप्रमुख आणि पोलिंग एजंटपर्यंतची कार्यकारिणी सदृढ, कार्यक्षम आणि अभ्यासू असणे आवश्यक आहे.
शिवसेनेच्या संघटनात्मक रचनेत शाखाप्रमुख हे अतिशय महत्त्वाचे पद आहे. शाखाप्रमुखांचा स्थानिक पातळीवरील अनेक मुद्द्यात हस्तक्षेप असतो. स्थानिक जनतेमध्ये त्यांचा थेट संपर्क असतो. आगामी निवडणुकीत ठाकरे गटासाठी शाखाप्रमुखच महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर अनेक नेत्यांनी जय महाराष्ट्र केला. मात्र, स्थानिक पातळीवरील बहुतांशी शाखाप्रमुख हे ठाकरेंसोबत राहिले.
आता, याच संघटनात्मक आधारावर आपल्याला निवडणुका जिंकायच्या आहेत. मागील निवडणूक प्रचाराची सुरवात मी सिंधुदुर्गमधून केले होती. त्यावेळी पुन्हा सिंधुदुर्गमधून झंझावात सुरू करावा अशी इच्छा आहे. गुहागरमध्ये एमआयडीसी आणण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न केले; मात्र गुहागरचे माजी आमदार विनय नातू यांनी त्याला विरोध केला. आपल्याकडे एमआयडीसी असती तर, स्थानिक तरुणांना रोजगार मिळाला असता. विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री उदय सामंत विधानसभा निवडणुकीदरम्यान गुहागरमध्ये आले आणि माजी आमदारच्या सांगण्यावरून आम्ही एमआयडीसी रद्द केल्याची घोषणा केली, हे त्यांचे कर्तत्व आहे, अशी टीकाही आमदार जाधव यांनी केलीय.