

Bhiwandi Municipal Election : महापालिका निवडणुकीचा प्रचाराने जोर पकडला असून, संवेदनशील पातळीवर पोहोचला आहे. विशेष करून, भाजपविरोधात सर्वच राजकीय पक्ष आक्रमक झालेले दिसत आहेत. पारंपारिक प्रतिस्पर्धी काँग्रेस कार्यकर्ते, यावेळी चांगलेच आक्रमक झालेले दिसत आहे.
भिवंडी महापालिका निवडणुकीच्या प्रचारावेळी काँग्रेस अन् भाजप कार्यकर्ते आमने-सामने येताच भडका उसळला. घोषणाबाजी होताच, लाठ्या-काठ्यांनी हाणामारी, खुर्च्यांची फेकाफेकी, दगडांचा मारा, पळापळी अन् परिसरात तणाव परिस्थिती, निर्माण झाली. याप्रकरणी दोन्ही बाजूच्या तक्रारीवरून नारपोली व भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
भिवंडी महापालिका निवडणुकीसाठी (Municipal Election) प्रचार पहिल्याच टप्प्यात शिगेला पोहोचला आहे. शनिवारी रात्री नारपोली भंडारी चौकात भाजप व काँग्रेस उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन हाणामारीची घटना घडली आहे. यात दोन्ही बाजूंकडून लाठ्या- काठ्या व दगडांचा मारा केल्याने दोन जण जखमी झाले आहेत.
भंडारी चौक नारपोली इथं भाजप (BJP) उमेदवार यशवंत टावरे व काँग्रेस उमेदवार जितेंद्र पाल यांचे कार्यालय रस्त्यात समोरासमोर आहे. शनिवारी रात्री काँग्रेस उमेदवारांची प्रचार रॅली या भागात आल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयाकडे जात घोषणाबाजी केली. यामुळे दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.
पुढे पर्यवसान हाणामारीत झाल्यानंतर दोन्हींकडून प्लॅस्टिक खुर्च्या, लाठ्या-काठ्या व दगड भिरकावण्यात आले. विशेष म्हणजे, या चौकात बंदोबस्तावर पोलिस तैनात असतानाच, रॅलीतसुद्धा पोलिस होते. त्यांच्यादेखत काँग्रेस कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप भाजप उमेदवार यशवंत टावरे यांनी केला आहे.
काँग्रेस नगरसेविका वैशाली म्हात्रे यांची मुलगी हर्षाली यांनी भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, या हाणामारीच्या घटनेनंतर नारपोली व भोईवाडा पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांच्या जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला.
या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन सांगळे यांनी भेट देत परिस्थिती शांत केली आहे. तर दोन्ही बाजूकडून पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.