

Badlapur Municipal Council : ठाणे इथल्या बदलापूर शहरात मोठ्या वादाला कारणीभूत ठरलेल्या स्वीकृत नगरसेवक नियुक्तीप्रकरणी अखेर तुषार आपटे याला आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
बदलापूरमधील खासगी शाळेतील दोन चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात संबंधित शाळेचे सचिव असलेले तुषार आपटे सहआरोपी असताना भाजपने त्याला स्वीकृत नगरसेवकपद दिल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
तुषार आपटे याने बदलापूर नगर परिषदेच्या उपमुख्याधिकाऱ्यांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. हा राजीनामा आता ठाणे (Thane) जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे; मात्र देशभर गाजलेल्या या गंभीर प्रकरणात सहआरोपी असलेल्या व्यक्तीला स्वीकृत नगरसेवकपद कसे दिले, असा सवाल उपस्थित करीत बदलापूरकरांनी तीव्र संताप व्यक्त केला.
बदलापूर लैगिंक अत्याचार प्रकरणात 'सकाळ माध्यम समूह' लक्ष ठेवून असून, त्याचा पाठपुरावा करत आहेत. यातून सहआरोपीला भाजपने (BJP) स्वीकृत नगरसेवक केल्याच्या प्रकारावरून समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
राजीनामा देताना तुषार आपटे याने, आदर्श विद्यामंदिर संस्था व भाजप पक्षाचे नाव खराब होऊ नये. दोन्ही संघटनांची बदनामी होऊ नये, यासाठी मी स्वेच्छेने स्वीकृत सदस्यपदाचा राजीनामा देत आहे, असे स्पष्टीकरण दिले आहे; मात्र पद मिळाल्यापासून अवघ्या एका दिवसातच भाजपवर टीकेची झोड उठली होती.
राज्यभरात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अकोटमधील भाजप-एमआयएम युती, अंबरनाथमधील काँग्रेससोबतची युती यामुळे भाजपवर ‘सत्तेसाठी काहीही’ अशी टीका होत आहे. बदलापुरातील या नियुक्तीमुळे भाजपला राज्यभरात टीकेचे धनी व्हावे लागले.
तुषार आपटे याने जरी राजीनामा दिला असला, तरी भाजपच्या या निर्णयामुळे बदलापुरात निर्माण झालेला रोष अद्यापही कायम आहे. आता रिक्त झालेल्या स्वीकृत नगरसेवकपदावर भाजपकडून कोणाच्या नावाची घोषणा होते आणि पक्षनिष्ठा जपणाऱ्या कोणता कार्यकर्ता किंवा पदाधिकाऱ्याला संधी दिली जाते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच उपशहरप्रमुख गिरीश राणे यांनी, भाजपने तुषार आपटे याचे स्वीकृत नगरसेवकपद रद्द करावे, अन्यथा बदलापूर बंदची हाक देण्यात येईल, असा इशारा दिला होता. तसेच तुषार आपटेचे नगरसेवक पद रद्द करावे, अन्यथा बदलापूर मनसे शाखेतर्फे अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शहराध्यक्ष निशांत मांडवीकर यांनी दिला होता.
दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी याप्रकरणी, कोणी भूमिका घेतली आहे, त्याच्यावर योग्य कारवाई होईल. ज्यांनी ज्यांनी चूक केली त्यांच्यावर कारवाई होत असते. निष्पक्षपणे कारवाई होईल चिंता करण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया दिली. यानंतर काही वेळातच तुषार आपटे याचा राजीनामा घेण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.