
New Mumbai BJP : भाजपचे विधान परिषदेचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याविरोधात पक्षातूनच नाराजीचा स्फोट झाला आहे. म्हात्रे हे नक्की भाजपचे आहेत की शिवसेनेचे हेच लक्षात येत नसल्याची खदखद बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राजन घोरपडे यांनी व्यक्त केली आहे. तर आपण कोणामुळे निवडून आलो, हे त्यांनी लक्षात ठेवून वागले पाहिजे, असा सल्ला मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे यांनी दिला आहे. त्यामुळे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यावर नवी मुंबईचे भाजप कार्यकर्ते, पदाधिकारीच नव्हे, तर आमदारही नाराज आहेत.
ज्ञानेश्वर म्हात्रे हे भाजपचे कोकण शिक्षक विधान परिषद मतदारसंघाचे आमदार आहेत. 2023 मध्ये म्हात्रे यांनी तत्कालिन आमदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांना जवळपास 11 हजार मतांनी पराभवाचा धक्का दिला होता. पण निवडून आल्यापासून म्हात्रे यांनी भाजपकडे साफ दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. त्यांनी आजवर एकाही कार्यकर्त्याला एक रुपयाचाही निधी दिलेला नाही, याउलट जिथे भाजप सक्रियपणे लढते तिथे शिवसेना आणि राष्ट्रवादीला निधी दिल्याचा आरोप होत आहे.
याबाबत राजन घोरपडे म्हणाले, म्हात्रे यांना भाजपची उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले. पण म्हात्रे यांनी आजवर भाजपच्या एकाही कार्यकर्त्याला निधी दिलेला नाही. उलट जिथे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आहेत, अशा प्रभागांमध्येही शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाच निधी दिला आहे, अशी खदखदही त्यांनी व्यक्त केली. शिवाय याबाबत वरिष्ठांकडे खदखद मांडणार असल्याचे ते म्हणाले.
याशिवाय मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे यांनीही म्हात्रे यांच्यावर तोंडसुख घेतले. आपण कोणामुळे निवडून आलो, हे त्यांनी लक्षात ठेवून वागले पाहिजे, असा सल्ला आमदार कथोरे यांनी दिला आहे. या आरोपांबाबत माध्यमांशी बोलताना आमदार म्हात्रे म्हणाले, मला सगळ्या पक्षांचे कार्यकर्ते भेटायला येत असतात. मी सगळ्यांना भेटतो. तरीही मला स्थानिक राजकारणात ओढण्याचा प्रयत्न केला जात असून आपण याबाबत वरिष्ठांशी चर्चा करू, असे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.