Maharashtra Kondal News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांच्या आरोग्याची चांगली सोय ज्या रुग्णालयामुळं झाली त्या कुडाळच्या जिल्हा महिला बाल रुग्णालयावरून आता राणे गट आणि नाईक गटात श्रेयवाद चांगलाच रंगला आहे. या रुग्णालयात चांगल्या सुविधा करण्यात आमदार वैभव नाईक अपयशी ठरल्याचा माजी खासदार निलेश राणे यांचा आरोप आहे. तर या रुग्णालयात असलेल्या सुविधामुळे राणे यांच्या पडवे येथील खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्ण जात नसल्याने निलेश राणे यांना पोटशूळ उठल्याचा आरोप राजन नाईक यांनी केला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य सुविधांची वाणवा आहे. दुर्गम भौगोलिक स्थितीमुळे खासगी आणि सरकारी रुग्णालयाची संख्या कमी आहे. यामुळे महिलांच्या आरोग्याची तर मोठी हेळसांड होत होती. नारायण राणे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी कुडाळमध्ये जिल्हा महिला बाल रुग्णालय मंजूर केले. या रुग्णालयाचे काम रखडले होते. त्याचा पाठपुरावा करून आमदार वैभव नाईक यांनी रुग्णालयात सुविधा आणल्या. त्यामुळे महिलांची चांगली सोय झाली. या रुग्णालयाचा वापर कोरोना काळातही चांगला झाला. महिलांच्या प्रसूती मोठ्या प्रमाणात इथं होतात. त्यामुळे कुडाळकरांना हे रुग्णालय म्हणजे आधार वाटतं.
माजी खासदार निलेश राणे यांनी या रुग्णालयाला भेट दिली. इथल्या सुविधांचा आढावा घेतला. रुग्णालयाला खुर्च्या दिल्या. यावेळी या रुग्णालयात चांगल्या सुविधा देण्यास आमदार वैभव नाईक असमर्थ असल्याचं म्हटलं. त्यामुळे आमदार वैभव नाईक समर्थक संतप्त झाले होते. या रुग्णालयाची मंजुरीच फक्त नारायण राणे यांनी आणली. त्यानंतर उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना मात्र, खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांनीच सगळ्या सुविधा उभ्या केल्या आहेत. या रुग्णालयात असलेल्या सुविधांमुळे राणे यांच्या खासगी रुग्णालयाकडे रुग्ण जात नाहीत त्यामुळे पोटशूळ उठल्याचा आरोप शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजन नाईक यांनी केला आहे. या आरोप प्रत्यारोपांनतर आता या रुग्णालयाबाबत सिंधुदुर्गच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.