
Raigad News : रायगडच्या पालकमंत्रिपदाचा चार महिने झाले तरी अद्याप सुटलेला नाही. केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्या रायगडच्या दौऱ्यात हा प्रश्न निकाली निघेल अशी अपेक्षा होती. मात्र याबाबत अजूनही काहीच अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या घरी अमित शाह यांनी केलेले स्नेहभोजन हा कार्यक्रमही तेवढाच लक्षवेधी आणि चर्चेचा ठरला.
त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगडचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादी दिले जावे यासाठी अमित शाहंकडे शब्द टाकल्याचे बोलले जाते. यासाठी त्यांनी राज्यातील पालकमंत्रिपद वाटपाचा फॉर्म्युला आणि इतर जिल्ह्यातील समीकरण शाह यांना समजावून सांगितली. आता थेट फडणवीस यांनीच तटकरे यांच्यासाठी शब्द टाकल्याने गोगावले यांची कोंडी झाल्याचे सांगितले जात आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमित शहा यांच्यासोबत प्रवासात चर्चा केली. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी शहा यांची स्वतंत्र भेट घेऊनही चर्चा केली. या चर्चेत प्रामुख्याने प्रश्न होता तो पालकमंत्रिपदाचा. त्याचवेळी फडणवीस यांनी रायगडचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादी दिले जावे यासाठी अमित शाहंकडे शब्द टाकल्याचे बोलले जाते.
सर्वात कमी पालकमंत्रिपदे राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याने रायगडचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्याचे सूत्र यावेळी स्पष्ट केले. तसेच मागच्या युती सरकारमध्ये कोल्हापूरचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ यांच्याकडे होते, ते आता शिंदे शिवसेनेच्या प्रकाश आबिटकर यांच्याकडे दिले आहे. परिणामी, रायगडचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादीला देणे अनिवार्य ठरले, हा मुद्दा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केला आहे.
सद्यस्थितीत नाशिक आणि रायगड ही दोन पालकमंत्रिपदे स्थगित आहेत. यातच बीडचे पालकमंत्रीपदही सध्या अजित पवार यांच्याकडे आहे. मात्र हे पालकमंत्रिपदही भाजपच्या पंकजा मुंडे यांना हवे आहे. परिणामी, एकूण चार जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीचे सरकारमध्ये आजही ठिणग्या उडताना दिसत आहेत.
2019 मध्ये महाविकास अघाडीचे सरकार सत्तेत आले त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगडचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांना दिले होते. या मुद्दयावरून मोठे महाभारत घडले. भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे असे जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार असूनही पालकमंत्री राष्ट्रवादीला दिल्याने तिघेही नाराज झाले. त्यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडात सहभाग घेत सरकार पाडले.
त्यानंतर शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर पहिले काही दिवस राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेच्या बाहेर होती; पण अवघ्या 6 महिन्यांत अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली आणि तेही सत्तेत आले. पुन्हा आदिती तटकरे कॅबिनेट मंत्री झाल्या आणि शिवसेना-राष्ट्रवादी वादाचा अंक पुन्हा सुरू झाला. यामुळेच रायगडचे पालकमंत्रिपद आदिती तटकरेंना न देता शिवसेनेच्या उदय सामंतांना दिले होते.
महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर हा वाद मागच्या पानावरून पुढे सुरूच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिती तटकरे यांचे पालकमंत्रिपद जाहीर केले होते. मात्र शिंदेंच्या शिवसेनेने केंद्रीय मंत्री शहा यांच्याकडे तक्रारी केल्यानंतर या निवडीला स्थगिती देण्यात आली. आता अमित शाह यांच्या रायगड दौऱ्यात हा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा होती. पण अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
त्यामुळे शहा यांचा रायगडचा दौरा कोणाच्या पथ्यावर पडणार, रायगडचे पालकमंत्रिपद कोणाला मिळणार, सुनील तटकरे यांचे स्नेहभोजन कामी येणार का? या हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.