
Sawantwadi News : पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजं असतानाच आता तळकोकणात देखील अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. येथेही एका विवाहितेनं मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. यानंतर आता विवाहितेचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी देवगडच्या माजी नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविकेसह त्यांच्या मुलावर गुन्हा दाखल झाला आहे. तर सौ. प्रिया पराग चव्हाण (वय 33) असे मयत विवाहितेचे नाव असून माजी सौ. प्रणाली मिलिंद माने (वय-42) माजी नगराध्यक्षा आणि आर्यन मिलिंद माने (वय - 18) असे मुलग्याचे नाव आहे. या दोघांच्या शोधासाठी सावंतवाडी पोलिसांचे पथक देवगडमध्ये गेले असून संशयितांनी पोलिसांना हुलकावणी दिली आहे. यामुळे जिल्ह्यात चोरदार चर्चा सुरू झाल्या असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी आमदार वैभव नाईक यांनी आरोपींना अटक न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
प्रिया चव्हाण ही अत्यंत मनमिळावू आणि घराला सांभाळून घेणारी होती. ती अशापद्धतीने आत्महत्या करूनच शकत नाही असा दावा तिच्या आई-वडिलांनी केला होता. तसेच प्रियाचा मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप देखील त्यांनी केला होता. यानंतर पोलिसांनी नणंद सौ. प्रणाली मिलिंद माने व आर्यन मिलिंद माने यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. पण अद्याप ते फरार आहेत. यावरून वैभव नाईक यांनी आरोपींना ताबडतोड अटक व्हावी अशी मागणी केलीय.
या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक सौ. माधुरी मुळीक करत असून संशयितांच्या अटकेची पुढील कारवाई केली जात आहे. यासाठी सावंतवाडी पोलिस उपनिरीक्षक सरदार पाटील, महिला पोलिस अधिकाऱ्यांचे पथक संशयितांच्या शोधासाठी रवाना झाले होते. मात्र संशयित नणंद सौ. प्रणाली मिलिंद माने व आर्यन मिलिंद माने तिथे आढळून आले नाही. पोलिसांनी संशयितांचा त्यांच्या घरी व अन्य ठिकाणी शोध घेतला. मात्र ते सापडले नाहीत. मृत प्रिया चव्हाण यांचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून तो फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात येणार आहे. तसेच पोलिस संशयितांचे मोबाईल लोकेशनही काढत आहेत.
प्रिया चव्हाण हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणात देवगडच्या माजी नगराध्यक्षा प्रणाली मानेंसह मुलगा आणि प्रणाली मानेंच्या पतीलाही ताबडतोब अटक करावी अशी मागणी जोर धरत आहे. अशीच मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी आमदार वैभव नाईक यांनी देखील केली आहे. तसेच या आरोपींना लवकर अटक न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन छेडू, असा इशाराही वैभव नाईक यांनी दिला आहे. ते चव्हाण कुटुंबियांशी भेट घेतल्यानंतर बोलत होते.
नाईक म्हणाले, ‘‘गुन्हा दाखल झालेल्या प्रणाली माने सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकारी आहेत. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी निःपक्षपातीपणे तपास करून त्याच्या मुळाशी जावे. गृहखात सत्ताधाऱ्यांकडे असले तरी या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. पोलिसांनी स्वतःहून या प्रकरणी तपास करून गुन्हा दाखल केला नाही. माहेरच्यांनी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता पोलिसांनी दोघा संशयितांना अटकपूर्व जामिनासाठी संधी न देता तात्काळ अटक करावी.
तसेच संशयित प्रणालीच्या पतीला आरोपी केले पाहिजे. वेगवेगळ्या कारणांसाठी देवगड पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. संबंधित सत्ताधारी पक्षाचे असल्याने पक्षपात होण्याचा संशय आहे. त्यामुळे योग्य तपास होऊन तात्काळ अटक न झाल्यास प्रसंगी तीव्र आंदोलन छेडू.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.