
Raigad News : राज्यात येत्या चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. जिल्हा परिषदांसह महापालिका, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष रणनीती आखत आहेत. पण केंद्र आणि राज्यातील सत्ता पाहता महायुतीकडे विरोधी कार्यकर्त्यांचा ओघ वाढलाय. मात्र रायगडमध्ये दोस्तीतच कुस्ती लागल्याचे समोर आले असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने भाजपचाच नेता फोडला आहे. यामुळे स्थानिकच्या आधीच महायुतीत चेहऱ्यांवरून रस्सीखेच पाहायला मिळत आहे.
मंडणगड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश शिगवण यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. प्रकाश शिगवण यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण आता त्यांनी स्वगृही परतण्याची निर्णय घेत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यावेळी शिगवण यांच्याबरोबरच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुभाष सपाटे उपाध्यक्ष फैरोज उकये यांनी देखील राष्ट्रवादीत प्रवेश केला.
यावेळी तटकरे यांनी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींबाबत वक्तव्य केलं आहे. त्यांनी, महायुती म्हणून सोमोरे जात असताना महायुतीतील तिन्ही घटक पक्षाचा परस्पर समन्वय महत्वाचा आहे. तिन्ही पक्षांच्या प्रमुखांची समन्वय समिती याबाबतचे निर्णय पक्ष नेतृत्वाच्या निर्णयाने घेणार आहे. निवडणुकीत महायुतीचे ऐक्य अबाधित ठेवूनच निवडणूका लढल्या जातील, असे संकेत त्यांनी दिले आहेत.
पुढे ते म्हणाले, राज्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व महानगरपालिका यामध्ये भिन्न भिन्न राजकीय परिस्थिती आहे. त्या परिस्थितीचे पक्ष व समन्वय समिती म्हणून अवलोकन केले जाईल. दीर्घकाळानंतर स्थिर सुशासन मिळाले आहे. मतदारांनी टाकेलला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून जनसामान्यांचे व राज्याचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करण्याची भूमिका आहे.
आठ वर्षांच्या दीर्घकाळाच्या प्रतिक्षेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ऑक्टोबरमध्ये होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवरील राजकीय परिस्थितीचे आकलन करणे गरजेचे आहे. महायुतीचे ऐक्य व सरकाराचे कामकाज हे आमच्या अग्रक्रमाचे विषय असल्याचे तटकरे यांनी सांगितले.
यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर भाष्य करताना तटकरे म्हणाले, राजकारणात प्रत्येक व्यक्ती आपापली भूमिका ठरवत असतात. ते घडल्यानंतर या संदर्भात भाष्य करणे समयोचित ठरेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.