

राजापूरमध्ये माजी विधान परिषद आमदार खलिपे महाविकास आघाडीच्या चिन्हावर नगराध्यक्षपदासाठी उतरल्यामुळे स्थानिक निवडणुका गाजत आहेत.
चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांनी थेट नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करत स्थानिक राजकारणात सक्रिय भूमिका घेतली आहे.
दोन्ही दिग्गज नेत्यांच्या मैदानात उतरण्याने रत्नागिरी जिल्ह्यातील निवडणुका अत्यंत चुरशीच्या बनल्या आहेत.
Ratnagiri News : सध्या राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरूवात झाली असून नामाकंन देखील भरण्यात आली आहे. कोल्हापूर, जळगावसह इतर ठिकाणी नेत्यांचे नातेवाईक निवडून आले आहेत. यामुळे ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे की नेत्यांच्या नातेवाईकांची हाच प्रश्न अनेकांना पडला आहे. यादरम्यान रत्नागिरीत दोन माजी आमदार थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता हे आमदार विकासाच्या नावाखाली स्वत:चे राजकीय पुनर्वसन करण्याची धडपड करत असल्याची येथे चर्चा सुरू झाली आहे.
जिल्ह्यातील नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकीची घोषणा झाली असून उमेदवारांनी अपक्ष आणि पक्षांच्या एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. येथे महायुतीतील भाजप पक्ष आणि शिवसेनेची जिल्ह्यात युती झाली असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला योग्य सन्मान देण्यात आलेला नाही. तसेच महाविकास आघाडीतही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला विश्वासात घेतलेले नाही. यामुळे महायुती असो किंवा महाविकास आघाडीत अलबेल नसल्याचे दिसत आहे.
दरम्यान नऊ वर्षानंतर होत असलेल्या चिपळूण पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असतानाच नगराध्यक्षपदासह शहरातील सर्व 28 जागांवर राजकीय आखाड्यात रंगत आली आहे. येथे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते रमेश कदम यांनी स्थानिक राजकारणात सक्रिय सहभाग घेत थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उडी घेतली आहे. रमेश कदम यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उडी घेतल्यानंतर काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी जोरदार टीका केली आहे.
त्यांनी, कदम यांनी आमदारकी लढवली, नगराध्यक्षही झाले, आता पुन्हा त्यांना नगराध्यक्षपद कशासाठी हवे. त्यांनी नवीन लोकांना संधी देऊन मार्गदर्शकाची भूमिका घ्यायला हवी. मात्र तेच नगराध्यक्षपदावर अडून बसले आहेत. माजी आमदारांचा ठाकरेंच्या शिवसेनेशी संवाद सुरू आहे. मात्र, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने आम्हाला योग्य सन्मान दिल्यास एकदिलाने काम करू. मात्र आता मीच नवरा होणार आणि मीच घोड्यावर बसणार, हा हट्ट कशासाठी हवा असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
याचपद्धतीने राजापूर पालिकेच्या निवडणुकीसाठी अखेरच्या दिवशी अर्ज दाखल करत माजी विधान परिषद आमदार खलिपे यांनी देखील खळबळ उडवून दिली आहे. माजी विधान परिषद आमदार खलिपे यांनी महाविकास आघाडीच्या चिन्हावर नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे.
यावेळी शिवसेना (उबाठा), काँग्रेस, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट), मनसे आणि समविचारी पक्ष यांच्यावतीने राजापूर नगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक एकत्रितपणे महाविकास आघाडी म्हणून लढण्यात येणार असून राजापूर नगर पालिकेवर महाविकास आघाडीचाच झेंडा फडकेल, असा विश्वासही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.
एकेकाळी राज्याच्या विधानसभेचे माजी आमदार रमेश कदम आणि माजी विधान परिषद आमदार खलिपे हे नेते आता थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या घडामोडींमुळे रत्नागिरीतील स्थानिक निवडणुका अधिक चुरशीच्या झाल्या असून, या नेत्यांच्या भूमिकेमुळे राजकीय समीकरणे कशी बदलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
FAQs :
खलिपे महाविकास आघाडी (MVA) च्या चिन्हावर राजापूर नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत आहेत.
रमेश कदम यांनी चिपळूण नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे.
जिल्ह्यातील निवडणुका अधिक चुरशीच्या होऊन राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वाढली आहे.
राज्यातील माजी आमदार आणि वरिष्ठ नेते थेट स्थानिक स्वराज्य निवडणुकीत उतरल्यामुळे या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
MVA ने खलिपे यांना पाठिंबा देत राजापूरमध्ये आपले बळ वाढवण्याची रणनीती आखली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.