

राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर मालवण पीडब्ल्यूडी कार्यालयात तोडफोड .
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनाही दिवाणी न्यायाधीशांनी सर्व आरोपांतून मुक्त केले.
न्यायालयाने दोघांविरुद्ध पुराव्याअभावी गुन्हा रद्द केला असून या निकालावर सिंधुदुर्गात मोठी चर्चा रंगली आहे.
Sindhudurg News : मालवण - राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पंच धातूचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. ज्यानंतर विरोधकांसह जनतेतून या दुर्घटमुळे छत्रपतींचा अपमान झाल्याची प्रतिक्रिया उमटत होती. यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव विजय नाईक यांनी मालवण मेढा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदार धरत कार्यालय फोडले होते. पण आता या प्रकरणात त्यांना मोठा दिलासा मिळाला असून कुडाळ येथील दिवाणी न्यायाधीश जी.ए.कुलकर्णी यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. तसेच न्यायालयाने मालवण तालुकाप्रमुख हरिश्चंद्र उर्फ हरी मोहन खोबरेकर यांचीही निर्दोष मुक्तता केली आहे.
कोकणातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा भारतीय नौदलाने उभारलेला पुतळा कोसळल्याची दुर्घटना 26 ऑगस्ट 2024 रोजी घडली होती. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. तर या दुर्घटनेला विरोधकांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला जबाबदार धरत टीकेची झोड उठली होती. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांचा पुतळा इतक्या निकृष्ट दर्जाचा कसा उभारला जाऊ शकतो, असा सवाल सामान्य नागरिकांसह विरोधकांकडून विचारला जात होता.
यानंतर, हा पुतळा भारतीय नौदलाकडून उभारण्यात आल्याचे स्पष्टीकरण राज्य सरकारकडून देण्यात आले होते. ज्यानंतर भारतीय नौदलाने एक निवेदन जारी करून आपली बाजू स्पष्ट करताना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दुर्दैवीरित्या जे नुकसान झाले त्याविषयी आम्हाला अतीव दु:ख आहे. राज्य सरकार, संबंधित तज्ज्ञमंडळी आणि नौदलातील अधिकाऱ्यांचे पथक तातडीने या दुर्घटनेचे कारण शोधण्यासाठी काम सुरु करेल. ही दुर्दैवी दुर्घटना होती. छत्रपती शिवरायांचा पुतळ्याची दुरुस्ती करुन तो पुन्हा राजकोट किल्ल्यावर लवकरात लवकर बसवला जाईल, असे नौदलाने म्हटले होते.
दरम्यान राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा पुतळा समुद्रातील वेगवान आणि खाऱ्या वाऱ्यांमुळे पडल्याचे सांगितले होते. या त्यांच्या स्पष्टीकरणानंतर या दुर्घटनेचे खापर एकमेकांवर फोडण्याचा उद्योग सुरु झाल्याचे समोर आले होते. ज्यानंतर कंत्राटदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या सर्व प्रकरणादरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरिश्चंद्र उर्फ हरी मोहन खोबरेकर यांनी जोरदार टीका केली होती. त्यांनी या प्रकरणात मालवण मेढा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदार धरत त्या कार्यालयाचा दरवाजा आणि खिडक्यांच्या काचा फोडून राग व्यक्त केला होता. यावेळी अन्य साहित्याचेही नुकसान केले होते.
याचप्रकरणात त्यांच्यावर मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस नाईक कैलास शिवाजी ढोले यांनी फिर्याद देत वैभव नाईक यांनी सा.बां. कार्यालयात जाऊन लाकडी दांड्याने कार्यालयातील दरवाजा व खिडकीच्या काचा फोडल्या. तसेच कार्यालयातील टेबलावरील काचा व संगणकावर दांडा मारून नुकसान केले व नंतर ते तेथून निघून गेले, अशी फिर्याद दिली होती.
त्यानुसार वैभव नाईक आणि हरी खोबरेकर यांच्यावर मालवण पोलीस ठाण्यात सार्वजनिक संपत्तीची हानी प्रतिबंधक अधिनियम- 1984 चे कलम 3 सह भारतीय न्याय संहीता-2023 चे कलम 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी कुडाळ येथील दिवाणी न्यायाधीश जी.ए.कुलकर्णी यांच्यासमोर सुनावणी सुरू होती. कुडाळ न्यायालयाने अॅड. सुधीर राऊळ, अॅड. कीर्ती कदम व अॅड. प्रज्ञेश राऊळ यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून दिवाणी न्यायाधीश जी.ए.कुलकर्णी यांनी माजी आमदार वैभव नाईक व हरी खोबरेकर यांची निर्दोष मुक्तता केली आहे.
FAQs :
1) वैभव नाईक यांच्यावर कोणता गुन्हा दाखल केला होता?
मालवण पीडब्ल्यूडी कार्यालयात दांड्याने काचा फोडून नुकसानी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.
2) या प्रकरणाचा संबंध शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटनेशी कसा आहे?
राजकोट येथे पुतळा कोसळल्याने संताप व्यक्त करण्यासाठी ही घटना झाल्याचा आरोप होता.
3) न्यायालयाने काय निर्णय दिला?
पुरावे अपुरे असल्याने वैभव नाईक आणि हरी खोबरेकर यांना निर्दोष मुक्तता देण्यात आली.
4) गुन्ह्याची तपासणी कोणत्या न्यायालयात झाली?
कुडाळ येथील दिवाणी न्यायाधीश जी.ए. कुलकर्णी यांच्या न्यायालयात.
5) या निर्णयाचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
स्थानिक राजकारणात या निकालामुळे नाईक गटाला बळ मिळणार असल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.