
तळकोकणातील माजी मनसे नेते व खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
प्रवेशानंतर भाजपकडून त्यांना महामंडळावर नियुक्ती देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या पत्नी वैभवी खेडेकर यांना आगामी खेड नगराध्यक्ष निवडणुकीत भाजप उमेदवारी मिळू शकते, अशी जोरदार चर्चा आहे.
Ratnagiri News : तळकोकणातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील हकालपट्टी केलेले नेते तथा खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचा अखेर भाजप प्रवेश झाला. त्यांच्या तीन तीनदा रखडलेल्या पक्ष प्रवेशामुळे खेडेकरांचा तळकोकणासह राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला होता. पण चार दिवस आधीच (14 ऑक्टोंबर) त्यांचा पक्षप्रवेश झाला आणि त्यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला. या प्रवेशानंतर आता भाजपने त्यांना दिवाळीचे डबल रिटर्न गिफ्ट दिलं आहे. सध्या याचीच जोरदार चर्चा रंगली आहे.
भाजप नेत्यांशी जवळीक साधणे, त्यांच्याबरोबर उठबस करण्याच्या कारणावरून मनसेनं खेडचे माजी नगराध्यक्ष खेडेकर आणि इतर तिघांवर पक्षातून हकालपट्टी करत कारवाई केली होती. ज्यानंतर खेडेकर यांनी भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेण्याची घोषणा केली. पण त्यांचा पक्ष प्रवेश या ना त्या कारणामुळे दोन वेळी रखडला. त्यानंतर त्यांनी मुंबईत तिसऱ्यांदा जावून भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि जेष्ठ नेते प्रवीण दरेकर यांची भेट घेतली. आणि त्यांच्या प्रवेशाचा अखेर मुहूर्त ठरला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे तळकोकणातील शिलेदार अशी ख्याती असलेले खेडेकरांचा अखेर 14 ऑक्टोंबर रोजी मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने भाजप प्रवेश झाला. तर तो भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झाला. यानंतर आता भाजपने त्यांना रिटर्न गिफ्ट दिल्याचे समोर येत आहे.
भाजप पक्षप्रवेशानंतर खेडेकर यांची वर्णी महामंडळावर लावण्यात येणार आहे. याबाबत पक्षश्रेष्ठींनीच खेडेकर यांना तसा शब्द दिल्याची चर्चा आहे. खेड नगरपरिषदेच्या आगामी नगराध्यक्ष पदावर खेडेकर यांची पत्नी वैभवी खेडेकर यांना संधी दिली जाऊ शकते, असेही आता बोलले जात आहे. तर हे पद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्यामुळे भाजप प्रवेश आता खेडेकर यांच्या पथ्यावर पडल्याचे समोर येत आहे.
पक्षप्रवेशाची हुकलेली हॅट्रीक
खेडेकर यांचा पक्षप्रवेश आजवर दोन वेळा रद्द झाला होता. तसेच त्यानंतर पक्षाकडून कोणतीच सूचना नसतानाच ते मुंबईत जावून भाजप नेत्यांची भेट घेत होते. यामुळे प्रवेशाचा हा मुद्दा सर्वाधिक चर्चेचा ठरला होता. तर त्यांचा प्रवेशाला मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा प्रखर विरोध असल्याच्या वावड्या उठल्या होत्या.
तसेच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आत्ताच तयारीला लागलेल्या काही स्थानिक इच्छुकांचा या प्रवेशाला विरोध असल्याचेही बोलले जात होते. मात्र आता या सगळ्या चर्चांना पूर्ण विराम लागला असून खेडेकर यांच्यासह अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे.
1. वैभव खेडेकर कोण आहेत?
वैभव खेडेकर हे खेड नगरपालिका माजी नगराध्यक्ष असून पूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत कार्यरत होते.
2. त्यांनी कोणत्या पक्षात प्रवेश केला आहे?
वैभव खेडेकर यांनी अलीकडेच भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे.
3. भाजपने त्यांना कोणती जबाबदारी दिली आहे?
त्यांना लवकरच महामंडळावर स्थान दिले जाण्याची शक्यता आहे, असे सूत्रांकडून समजते.
4. वैभवी खेडेकर यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळणार का?
अधिकृत घोषणा झालेली नसली तरी भाजपकडून त्यांना नगराध्यक्षपदासाठी संधी मिळू शकते, अशी चर्चा आहे.
5. या घडामोडींचा स्थानिक राजकारणावर काय परिणाम होईल?
खेडमधील भाजपचा प्रभाव वाढण्याची शक्यता असून, मनसे आणि इतर पक्षांना नव्या आव्हानांना सामोरे जावे लागेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.