

Shivsena UBT Politics : राम मंदिरातील कथित देणगी चोरी प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून ठाकरेंच्या शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेनेकडून भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेत याआधीच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात रामरक्षा आंदोलन करण्यात आले आहे. तसेच केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल करत या लढ्यात हिंदुत्ववादी संघटनांनी रस्त्यावर उतरावे, असे आवाहन केले आहे.
दरम्यान, आता याच मुद्द्यावरून शिवसेनेचे नेते आमदार भास्कर जाधव यांनीदेखील आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी या मुद्द्यावरून थेट भाजपवर जळजळीत टीका करत हल्लाबोल केला आहे. तसेच हे हिंदुत्ववादी नाहीत, तर हिंदुत्वाचे मारेकरी असून आता 2029 मध्ये जनता उत्तर देईल, असे म्हटले आहे. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे महाराष्ट्रात नवा राजकीय संघर्ष सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एकीकडे राज्यासह देशभर राम मंदिरातील कथित देणगी चोरी प्रकरणावरून राजकारण तापले असतानाच सर्वोच्च न्यायालयाने राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला नोटीस बजावली आहे. तसेच याच प्रकरणात केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारलादेखील नोटीस बजावण्यात आली आहे. या कथित देणगी चोरी प्रकरणावर भारताचे सरन्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी हे आदेश देण्यात आले असून दाखल झालेल्या याचिकांवर उत्तर, एसआयटी चौकशीचा स्टेटस रिपोर्ट आणि सीसीटीव्ही फुटेज सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या सोमवारी होणार आहे.
आमदार भास्कर जाधव यांनी भाजपवर जळजळीत टीका करताना, "हे लोक कलियुगातले सगळ्यात लुटारू आहेत. आता यांचा खरा चेहरा समोर आणायची संधी रामानेच आपल्याला दिली आहे. त्यामुळे पक्षीय बॅनर न घेता रामाचा बॅनर आणि भगवा झेंडा घेऊन मतदारसंघातील प्रत्येक गावागावात जाऊन सभा घेणार," अशी घोषणा केली आहे. तसेच या लोकांचे पाप सामान्य जनतेला सांगणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.
भास्कर जाधव यांनी भाजपवर निशाणा साधत, "हे खरे हिंदुत्ववादी नाहीत, तर हे हिंदुत्वाचे मारेकरी आहेत. 2029 ला राम यांना तुडवल्याशिवाय राहणार नाही," असाही प्रहार केला आहे. तसेच 1400 कोटी रुपयांची चोरी कोणी केली? काँग्रेस, आप किंवा जनता दलाने नाही, तर ही चोरी दुसऱ्या-तिसऱ्या कुणीही केलेली नाही. भाजपशी संबंधित असलेल्या संघटनांनीच केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
हे हिंदुत्ववादी नाहीत, तर हिंदुत्वाचे मारेकरी असून आता 2029 मध्ये जनता उत्तर देईल. पण आता हा विषय अजिबात बाजूला करण्याचा नसून देशात अनेकांनी उठावाला सुरुवात केली आहे. आता आपणही शांत बसणार नसून पक्षाचा झेंडा नव्हे, तर रामाचा झेंडा घेऊन गावोगावी भाजपवाल्यांचे पाप जनतेसमोर नेणार असल्याचेही ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.