

अर्ज दाखल करण्यासाठी एकच दिवस शिल्लक असतानाही महाविकास आघाडी जाहीर झालेली नाही.
अजित पवार गटाने एकला चलोची भूमिका घेतली असून भाजप-शिवसेना युती प्रचारात आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेने रत्नागिरीत उमेदवारांची यादी जाहीर करत एबी फॉर्म दिले आहेत.
Ratnagiri News : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याला अवघा एक दिवस शिल्लक असतानाही महाविकास आघाडीचे मेतकूट अद्याप जुळलेले नाही. तसेच महाविकास आघाडीतील पक्षांत एकवाक्यताही राहिलेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडी अद्याप जाहीर झालेली नाही. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने एकला चलोची भूमिका घेतली तर शिवसेना आणि भाजप युती जाहीर झाली असून, त्यांचे उमेदवारही गावोगावी प्रचारात गुंतले आहेत.
अशातच ठाकरेंच्या शिवसेनेनं रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील उमेदवारांची यादी माजी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत जाहीर केलीय. तर या उमेदवारांना पक्षाचा एबी फॉर्मही देण्यात आला आहे. यामुळे आघाडीची वाट न पाहता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं निवडणुकीत आघाडी घेतली आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याला अवघा एक दिवस शिल्लक असतानाही युतीच्या एकाही उमेदवाराने अद्याप उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. गेल्या १५ ते २० वर्षात भाजपचा एकही सदस्य विजयी झालेला नाही. युतीत भाजपला ६ ते ७ गणातील जागा सोडल्याची चर्चा आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने संगमेश्वर तालुक्यातील महायुती सोबत जुळवून घेतले; मात्र चिपळूण तालुक्यात स्वबळावर लढण्याची तयारी ठेवली.
१८ गणात आणि ९ गटात उमेदवार देण्याची तयारी आमदार शेखर निकम यांनी ठेवली आहे. महाविकास आघाडीतील ठाकरे सेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये ताळमेळ राहिलेला नाही. आघाडीसाठी कोणी कोणाला भेटायचे त्यासाठी पुढाकार घ्यायचा तरी कोणी, अशी अवस्था झाली आहे. काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीसाठी आमदार भास्कर जाधव यांच्याशी आघाडीतील मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्यांची खलबते झाली. उमेदवारी दाखल करण्यास १६ जानेवारीपासून सुरुवात झाली. अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत; मात्र गेल्या दोन दिवसात एकाही राजकीय पक्षाच्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केलेले नाहीत.
इच्छुकांना बळ देणारा नेता नाही
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सेनापती रमेश कदम यांनीच निवडणुकीच्या तोंडावर पक्षाचा राजीनामा दिला. परिणामी, त्यांच्या पक्षाचे सैनिक वाऱ्यावर पडल्यासारखी स्थिती आहे. उमेदवार लढण्यासाठी इच्छुक आहेत; मात्र त्यांना बळ देणारा नेता नाही. मध्येच रमेश कदम दुसऱ्या पक्षात गेले तर ते विरोधात प्रचार करायला मोकळे, याचीही चिंता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांना आहे. यामुळेच निवडणूक लढण्यासाठी इच्छुक कार्यकर्ते द्विधा मनःस्थितीत असल्याची चर्चा आहे.
या दरम्यान शिवसेनेपाठोपाठ रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील उमेदवारांची यादी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनं जाहीर केले आहेत. माजी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली असून यावेळी उमेदवारांना पक्षाचा एबी फॉर्मही देण्यात आला.
रत्नागिरी तालुक्यातील पंचायत समिती गणासाठी वाटदमधून प्रणाली प्रकाश मालप, कळझोंडीमधून दीक्षा संतोष हळदणकर, खालगावमधून स्वाती वैभव गावडे, करबुडेमधून सुरेश कारकर, नेवरेमधून दिव्यता दत्तात्रय आग्रे, कोतवडेमधून हरिश्चंद्र धावडे, साखरतरमधून आदेश शशिकांत भाटकर, झाडगाव म्यु. बाहेरमधून सुगरा शहानवाझ काझी, केळ्येमधून गौरव सूर्यकांत नाखरेकर, कुवारबावमधून उमेश राऊत, नाचणेतून विजयकुमार ढेपसे, हरचिरीमधून दत्तात्रय गांगण, भाट्येतून किरण रवींद्र नाईक, गोळपमध्ये अविनाश गुरव, पावसमधून सुभाष पावसकर, गावखडीतून कृषा किसन पाटील, तर कर्लामधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नसिमा डोंगरकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या सर्वांना पक्षाचे एबी फॉर्म देण्यात आले आहेत.
राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, वंचितशी आघाडी
रत्नागिरीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, वंचितशी आघाडी केली जाणार असून, मनसेलाही जागा सोडल्या जाणार आहेत. संबंधित पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून स्थानिक पातळीवर निर्णय घेतला जाईल, असे माजी खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.
1) महाविकास आघाडी अद्याप जाहीर का झाली नाही?
आघाडीतील पक्षांत मतभेद आणि एकवाक्यतेचा अभाव असल्याने आघाडी जाहीर झालेली नाही.
2) अर्ज दाखल करण्यासाठी किती वेळ शिल्लक आहे?
अर्ज भरण्याला अवघा एक दिवस शिल्लक आहे.
3) ठाकरेंच्या शिवसेनेने कोणती पावले उचलली आहेत?
रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवार जाहीर करून एबी फॉर्म दिले आहेत.
4) उमेदवार जाहीर करताना कोण उपस्थित होते?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत उपस्थित होते.
5) इतर पक्षांची भूमिका काय आहे?
अजित पवार गट एकला चलोवर ठाम असून भाजप-शिवसेना युतीने प्रचार सुरू केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.