

नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांदरम्यान मालवणमधील राजकीय वाद आणि स्टिंग ऑपरेशनमुळे राज्याचे लक्ष येथे केंद्रित झाले होते.
निकाल जाहीर होताच मालवणमध्ये शिंदे शिवसेनेने विजय मिळवला आहे.
या विजयानंतर आमदार निलेश राणे यांनी भावुक प्रतिक्रिया देत कार्यकर्त्यांचे आभार मानले.
Sindhudurg News : एकीकडे राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालानंतर गुलाल उधळला जात आहे. तर दुसरीकडे निवडणुकीआधी राजकीय चिखलफेक आणि शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आमदार निलेश राणे यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे मालवणमध्ये काय होणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते. येथील निकाल आता आला असून शिंदेंच्या शिवसेनेचा विजय झाला आहे. या विजयावर आता निलेश राणेंनी भावुक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, ‘एका डोळ्यात आनंद तर दुसऱ्यात अश्रू आहेत’, असे माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे, ज्याची आता राज्यभर चर्चा सुरू झाली आहे.
राज्यातील २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायती अशा २८८ पालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी अद्याप सुरू आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर भाजपचा विजय झाला असून विविध ठिकाणी महायुतीने आपला झेंडा फडकावला आहे. दरम्यान राज्याचे लक्ष हे मालवणच्या निवडणुकीकडे लागले होते.
येथे निवडणुकीच्या आधी मोठ्या राजकीय घडामोडी, राणे बंधूंमध्ये झालेला सत्तासंघर्ष आणि राजकीय चिखलफेकसह आरोप-प्रत्यारोपाची राळ उठली होता. याचदरम्यान सर्वाधिक खळबळ आमदार निलेश राणे यांनी भाजप पदाधिऱ्याच्या घरी जाऊन केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे उडाली होती. यामुळे येथे काय होणार? कोणाच्या बाजूने निकाल लागणार? निलेश राणे शिवसेनेला तारणार की नितेश राणे भाजपला सत्ता मिळवून देणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते.
यादरम्यान विविध राजकीय चर्चांनी वातावरण तापले असतानाच आज अखेर निकाल आला आणि जे निलेश राणेंच्या मनात होतं तेच झाल्याचे आता समोर आले आहे. येथे निलेश राणेंनी आपल्याच भावाला धोबी पछाड दिला आहे. या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या ममता वराडकर यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. भाजप उमेदवाराचा त्यांनी जवळपास १०१९ मतांनी पराभव केला आहे. आमदार नीलेश राणे यांचे सूक्ष्म नियोजन आणि रणनीतीपुढे भाजपचे आमदार, मंत्री नितेश राणे यांचा निभाव लागला नसल्याचेच आता समोर आले आहे. येथे मालवण नगरपरिषदेत शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत २० पैकी १० नगरसेवक निवडून आणले आहेत. यानंतर आता निलेश राणे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांनी या विजयाची आनंद नक्कीच असून ‘एका डोळ्यात आनंद तर दुसऱ्यात अश्रू आहेत’, असे म्हटलं आहे. या निवडणुकीत माझी एकट्याची जादू वैगेरे काही नाही. हा विजय जनतेचा आहे. लोकांनी आशीर्वाद दिले, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांच्यासह आमच्या सर्व नेत्यांनी केलेल्या प्रयत्नांचा हा विजय आहे. यामुळे विजय हा एकट्याचा नसतो, हा विजय जनतेचा असतो, आमचा असतो, असे त्यांनी म्हटलं आहे.
तसेच त्यांनी, आज आमच्या विजयाचा दिवस असून आज माझ्या भावना अशा आहेत की एका डोळ्यात आनंद आणि दुसऱ्यात डोळ्यात अश्रू आहेत. आम्ही शहर विकास आघाडी म्हणून लढलो असलो तरी आमच्या समोर जे कोणी लोक होते, ते भाजपचे होते. ते देखील आमचंच कुटुंब आहे. मात्र, तरीही कुटुंब एका बाजूला आणि निवडणूक दुसऱ्या बाजूला होती”, असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी, निवडणूक म्हटलं की कोणाचातरी पराभव होत असतो आणि कोणाचातरी विजय होत असतो. त्यामुळे जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे, त्याचं आम्हाला समाधान आहे. आता आमच्यावर आणखी जबाबदारी वाढली आहे. आता आम्ही शहराच्या विकासासाठी काम करू, असेही निलेश राणे म्हणाले आहेत.
दरम्यान, मालवण नगरपरिषदेच्या निवडणुकीत निलेश राणे आणि भाजप नेते नितेश राणेंसह प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रतिष्ठा पणाला लागली होती. यामुळे येथे साम-दाम-दंड भेद सगळेच मार्ग निवडणुकीत वापरण्यात आले होते. येथे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सतत येत होते. यावरूनच निलेश राणे यांनी युतीसाठी आग्रह धरला होता. मात्र भाजपकडून प्रतिसाद न मिळाल्याने शिवसेना आणि भाजपमध्येच थेट लढत झाली.
यादरम्यान निलेश राणे यांनी मालवणमधील विजय केनवडेकर या भाजपच्या पदाधिऱ्याच्या घरी छापा टाकला होता. यावेळी त्यांच्या घरात नोटांनी भरलेली एक बॅग आढळून आली होती. या संदर्भात निलेश राणे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर लाईव्ह देखील केलं होतं. तसेच या लाईव्ह व्हिडीओमध्ये निलेश राणे यांनी भाजपावर गंभीर आरोप करत थेट रवींद्र चव्हाण यांचे नाव घेत मतदारांना पैसे वाटण्यासाठीच पैसे उतरल्याचा दावा केला होता. ज्यानंतर निवडणुकीत पैसांच्या भाव देखील समोर आले होते. यावरूनच भाजप आणि शिवसेनेत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. जे हिवाळी अधिवेशनापर्यंत सुरू होते. यानंतर मात्र एकनाथ शिंदे यांनी रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा करत हा वाद थांबवण्याचा सल्ला दिला होती. ज्यानंतर निलेश राणेंनी अधिवेशानात चव्हाण यांची भेट घेत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता.
1. मालवण निवडणुकीकडे राज्याचे लक्ष का लागले होते?
निवडणुकीपूर्वी झालेली राजकीय चिखलफेक आणि निलेश राणेंच्या स्टिंग ऑपरेशनमुळे ही निवडणूक चर्चेत होती.
2. मालवण नगरपरिषद निवडणुकीत कोण विजयी झाले?
शिंदे गटाच्या शिवसेनेने या निवडणुकीत विजय मिळवला आहे.
3. निकालानंतर निलेश राणेंनी काय प्रतिक्रिया दिली?
विजयानंतर त्यांनी भावुक होत कार्यकर्ते आणि मतदारांचे आभार मानले.
4. या निकालाचा राजकीय अर्थ काय मानला जातो?
वादांनंतरही शिंदे शिवसेनेची स्थानिक पकड मजबूत असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले.
5. हा निकाल आगामी निवडणुकांवर परिणाम करेल का?
होय, आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांसाठी हा निकाल महत्त्वाचा मानला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.