

नाकाबंदीदरम्यान भाजप पदाधिकाऱ्याच्या कारमधून दीड लाख रुपयांची रोकड जप्त झाली असून त्यानंतर राजकीय गोंधळ उडाला.
निलेश राणे यांनी पोलिस ठाण्यात ठिय्या धरत कारवाईची मागणी केली आणि भाजपकडून पैसे वाटप केल्याचा आरोप केला.
राणे यांनी निवडणूक आयोगावर नाराजी व्यक्त करत कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे.
Sindhudhurg News : आज मंगळवार (ता 2) राज्यभर नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मतदानाची मुदत संपली तरीही अनेक ठिकाणी अजूनही मतदान सुरूच आहे. यामुळे राज्यात यंदा विक्रमी मतदान होण्याची शक्यता आहे. अशातच मालवणमध्ये मतदानाच्या आदल्या दिवशी सापडलेल्या दीड लाखांच्या रोकडवरून आणि त्याआधी केलेल्या स्टिंग ऑपरेशनंतर पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यावरून शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी याबाबत आज निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांची भेट घेत आगपाखड केली आहे. ज्यानंतर ता निलेश राणेंच्या दबंग पॉलिटिक्सची राज्यभर चर्चा सुरू झाली आहे.
नुकताच निलेश राणे यांनी मालवणमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर धाड टाकत स्टिंग ऑपरेशन केले होते. यावेळी त्यांनी भाजपकडून पैसे वाटप सुरू असल्याचा गंभीर आरोप केला होता. तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणच हे सगळं करत असल्याचा दावा केला होता. ज्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. यामुळे येथील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले होते. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात होत्या.
अशातच मतदानाच्या आदल्या दिवशी पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान एका कारमध्ये लाखांची रक्कम सापडली. तर ही कार भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्याची असल्याची माहिती पुढे आल्यानंतर निलेश राणे पुन्हा आक्रमक झाले होते. त्यांनी आक्रमक भूमिका घेत मालवण पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडत कारवाईची मागणी केली होती. त्यामुळे येथे पहाटेपर्यंत हा हाय होल्टेज ड्रामा पाहाला मिळाला होता. दरम्यान आता या सर्व घडामोडींच्या दरम्यान निलेश राणे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांसह जिल्हाधिऱ्यांची भेट घेत जोरदार अक्षेप नोंदवत निवडणुक आयोग आणि पोलिसांबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
त्यांनी, मी फक्त कारवाई काय केली याची चौकशी करायला येथे आलो असून अद्याप कोणतेही पंचनामे झाले नाहीत. ज्या दुसऱ्या गाडीवर एफआयआर दाखल झाला, त्या गाडीला नंबर प्लेट नव्हती. त्यावर मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई झाली. पण जी व्हायला हवी ती झालेली नाही. ज्यात पैसे आढळले त्या गाडीवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
मी जेव्हा याबाबात पोलिसांकडे विचारणा केली, तेव्हा त्यांनी मला निवडणूक आयोगाकडे अहवाल पाठवला असल्याचे सांगितले. निवडणूक आयोग स्वतःची प्रक्रिया करेल, असे सांगण्यात आले. पण आता आयोग म्हणते हे पोलिसांचे काम आहे आम्ही फक्त अहवाल पुढे पाठवू. यामुळे यात आता आम्हाला न्याय काय मिळणार आहे की नाही. हेच कोणीच स्पष्ट करत नाही. पोलीस आणि आयोग एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचे काम करत असल्याचा आरोप निलेश राणेंनी केला आहे.
ते पुढे म्हणाले की, मी लोकप्रतिनिधी असूनही माझ्यावर 24 तासांत कारवाई होऊ शकते. पण मी चोरी पकडून दिला असताही त्यांच्यावर अजूनही कारवाई झालेली नाही. ते मोकाट बाहेर फिरत आहेत. माझ्यावर कारवाई झाली, गुन्हा दाखल केला. मी घाबरत नाही. असे 100 गुन्हे दाखल करा. पण आता यांच्यावर कोणती कारवाई करणार ते सांगा...
जर तुम्ही म्हणत असाल की हे डॉक्युमेंट पब्लिक आहेत. तर ते पब्लिकमध्ये कधी येणार? ते मिडीयाला द्यायला हवे होते. मला द्यायला हवे होते. पण हेही झालेले नाही. कारवाईचा बनाव केला जात आहे. यावेळी त्यांनी अशोक सावंत यांच्या घरासमोरील दहा गाड्यांचा उल्लेख करताना, त्यांच्या फक्त “गाड्या तपासल्या, पण घरातून कुठेतरी बॅग फेकल्याचा आवाज येत असताना, आम्ही सांगत असतानाही त्याकडे कानाडोळा का? उलट माझ्यावरच केस दाखल केली.
आयोगाला कोर्टात खेचणार
पण आता आपण शांत बसणार नाही. ज्यांच्यावर आम्ही आरोप केलेले आहेत ते सर्व मोकाट बाहेर फिरत आहेत. त्यांच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही. हे मला माहिती होतं त्यामुळे आता वकिलांशी बोलून या विषयात जे जे आहेत. ते कोणत्याही पार्टीचे असोत. ज्यांचा यात हातभार असेल अशा सगळ्यांना कोर्टात खेचणार आहे. निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार असल्याचे सांगत आपल्याकडे आता पर्याय उरलेला नसल्याचे सांगत मोठा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे.
FAQs :
1. कारमधून किती रोकड जप्त करण्यात आली?
दीड लाख रुपये.
2. जप्त झालेली कार कोणाची असल्याचे उघड झाले?
स्थानिक भाजप पदाधिकाऱ्याची असल्याची माहिती आहे.
3. निलेश राणे यांनी काय मागणी केली?
तात्काळ कारवाई आणि तपासाची मागणी.
4. राणे यांनी पोलिस ठाण्यात का ठिय्या मांडला?
पोलिसांनी योग्य कारवाई न केल्याचा आरोप करत त्यांनी आंदोलन केले.
5. राणे यांनी पुढील पाऊल काय जाहीर केले?
निवडणूक आयोगाला कोर्टात खेचण्याचा इशारा दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.