Maratha Reservation : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा मंगळवारी सातवा दिवस आहे. मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. दुसरीकडे मराठा आरक्षणप्रश्नी केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी मंत्री रामदास कदम बॅकफूटवर आले आहेत.
नारायण राणे, रामदास कदम यांनी मराठा समाजाला आरक्षणासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याने अडचणीत वाढ झाली आहे. जागोजागी राणे, कदम यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. त्याशिवाय आगामी काळात मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्वच राजकीय नेत्यांना मराठा समाज त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिल्याने अडचणी वाढल्या आहेत. मराठा समाजाच्या जोरावर केवळ नेतेच नव्हे, तर सत्ता भोगणाऱ्यांनी समाजावर अन्याय होत असताना समाजासोबत राहण्याचे सोडून विरोधाची भूमिका घेतल्याने संपूर्ण मराठा समाजातून या नेत्यांचा निषेध केला जात आहे.
राज्यातील नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी कोकणातील मराठा समाज कुणबी जातीचे दाखले घेणार नाही, असे म्हटले होते. यावर रामदास कदम यांनीही आपली तीच भूमिका असल्याचे सांगितले. त्यामुळे कुणबी जातीचे दाखले घेण्यावरून कदम आणि नारायण राणेंचे एकमत झाले असल्याचे दिसते. दुसरीकडे, आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांचा अभ्यास चांगला आहे; पण थोडा कच्चा आहे.
विदर्भ, मराठवाडा येथील मराठे कुणबी प्रमाणपत्र घेतील; पण कोकणात कुणबी मराठा रोटी बेटी व्यवहार होत नाहीत. जरांगे यांना हे माहिती नाही. त्यामुळे कोकणातील मराठे असे कुणबी प्रमाणपत्र घेणार नाहीत. सरकारला अडचणीत आणण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत. जरांगे यांच्या उपोषणामागे काही राजकीय शक्तींचा हात आहे, असा आरोपही माजी मंत्री रामदास कदम यांनी केला. या वक्तव्यामुळे कदम अडचणीत आले आहेत.
केंद्रीय मंत्री नारायण राणे, रामदास कदम यांच्या या वक्तव्यावर शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार विनायक राऊत यांनी सडकून टीका केली आहे. नारायण राणे, रामदास कदम मराठा आणि कुणबी समाजात भांडणं लावण्याचं काम करत आहेत. त्याची दखल दोन्ही समाज घेतील, असेही राऊतांनी म्हटलं आहे, तर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी घणाघाती टीका केली आहे.
मराठा समाजाला आरक्षणाची गरज नसल्याचे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. या विधानाच्या तीव्र प्रतिक्रिया विविध शहरात उमटल्या आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही अतिशय वास्तव मागणी आहे. त्यासाठी मदत न करता, त्यावर उपहास करणारे नेते व त्यांचे समर्थक अडचणीत आले आहेत. त्यांचा सर्वत्र निषेध करण्यात आला.
दरम्यान, नारायण राणे, रामदास कदम यांच्या वक्तव्याचा मराठा समाजातून तीव्र निषेध करण्यात येत आहे. विविध भागात त्याचा निषेध होत असून, आंदोलकांकडून वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नेत्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली जात आहे, तर गावोगावी या नेत्यांच्या प्रतिमेला जोडे मारून दहनही करण्यात येत आहे. मराठा समाजाच्या जोरावर केवळ नेतेच नव्हे, तर सत्ता भोगणाऱ्यांनी समाजावर अन्याय होत असताना समाजासोबत राहण्याचे सोडून विरोधाची भूमिका घेतल्याने संपूर्ण मराठा समाजातून या नेत्यांचा धिक्कार केला जात आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.