

Ratnagiri Political News : कोकणातील रायगड जिल्ह्यात महायुतीतील शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीतील वाद अद्याप थांबलेला नाही. तोच रत्नागिरीत देखील नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. एकीकडे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा एका कृतीमुळे या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे महायुतीतील दुसरे नेते मंडळी मात्र एकत्र येत एकाच वाहनातून प्रवास करताना दिसत आहेत. यामुळेच आता नव्या राजकीय समिकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
रत्नागिरीत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या निमित्ताने उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार नारायण राणे आणि खासदार सुनील तटकरे यांच्यासह गृहराज्यमंत्री योगेश कदम एकत्र आले होते. यानंतर शासकीय विश्रामगृहात तटकरे दाखल झाल्यानंतर मात्र कदम यांनी त्यांची भेट टाळली. उलट त्यांच्याकडे पाठ करत ते निघून गेले.
या घटनेनंतर आता दापोली विधानसभा मतदारसंघातील दोन्ही नेत्यांमधील राजकीय मतभेदांच्या चर्चा जिल्ह्यात होताना दिसत आहे. या घटनेची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून योगेश कदमांनी तटकरेंना टाळल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे तटकरे यांच्यावर जोरदार प्रहार करणारे उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार नारायण राणे मात्र तटकरे यांच्यासह जुळवून घेताना दिसत आहे. बैठकीनंतर या प्रमुख नेत्यांनी एकाच वाहनातून प्रवास केला आहे. तिन्ही नेत्यांचे चांगलं बाँडिंग देखील समोर आले आहे. दरम्यान या प्रवासात तिन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? याबाबतचे तर्कवितर्क लढवले जात आहेत. या प्रवासावरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, या बैठकीनंतर तटकरे यांनी दापोली अणूऊर्जा प्रकल्पाबाबत सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, दापोली अणूऊर्जा प्रकल्पाबाबत सामंजस्य करार झाल्याचे आपल्या वाचनात आले आहे. पण कोकणात रासायनिक प्रकल्प येऊ नयेत ही कोकणवासीयांची भूमिका असून त्याला त्यांचा विरोध आहे. यामुळे दापोलीला जावून मी शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहे. या चर्चेनंतरच मुख्यमंत्र्यांकडे शेतकऱ्यांची भूमिका मांडेन, असे तटकरे यांनी सांगितले आहे.
तसेच अणुऊर्जा ही राष्ट्राची नक्कीच गरज आहे. पण दापोलीला निसर्गाचे वरदान लाभले असून ब्रिटिश कालापासून दापोली थंड हवेचे ठिकाण आहे. येथे पर्यटनावर आधारित रोजगार आहे. यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून सरकारने निर्णय घ्यावा अशी आपली भूमिका असल्याचेही तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.