
Raigad News : राज्याच्या राजकारण ज्या पद्धतीने दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी फुटीने राजकीय भूकंप आला होता. त्याचपद्धतीने आता दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेना एकत्र येतील या चर्चांनी अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. दरम्यान आता दोन्ही राष्ट्रवादीवरून अनेक नेत्याच्या प्रतिक्रिया येत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिला आहे. त्यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुन्हा एकदा एकत्र येतील अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. याची सुरूवात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांच्या दरम्यान झाली होती. यावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत होत्या. अशावेळी तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात अद्याप कोणतीच चर्चा नाही किंवा कोणतीच चर्चा नसल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.
गेल्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार एकत्र येत होते. विविध बैठका आणि कार्यक्रमांसाठी दोघेही एकत्र येत असल्याने या चर्चांना उकळी फुटली होती. याबाबत तटकरे यांना रायगडमध्ये विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच या चर्चांना धुडकावून लावले. त्यांनी, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत आमच्याकडे असा कोणताही ही प्रस्ताव आलेला नाही. तसेच वरिष्ठ पातळीवर याबाबत कुठलीही चर्चा झालेली नसल्याचे सांगत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या गोटात देखील हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या चर्चेंच्या दरम्यान बुधवारी (ता.14) शरद पवार यांची भेट घेतली. तसेच शिवेसना (ठाकरे गट) आमदार सचिन आहिर यांनीदेखील पवार यांची भेट घेतली होती.
या चर्चेवरून भाजप नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत जोरदार टीका केली होती. त्यांनी, राष्ट्रवादी पक्ष हा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या पवार कुटुंबापुरता मर्यादित असल्याचे म्हटले होते. तर राष्ट्रवादी एकत्रिकरणाच्या या केवळ चर्चाच असून त्या पवार कुटुंबात नेहमीच होतात; पण, पुढे जाऊन त्या प्रत्यक्षात येत नाहीत. आताही या चर्चा सुरू झाल्या आहेत. पण अजित पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळे एवढाच त्यांचा पक्ष असल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता.
तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील या चर्चांवर प्रतिक्रिया देताना मोठं विधान केलं होतं. ज्याची राज्यासह देशाच्या राजकारणात चर्चा सुरू झाली होती. आठवले यांनी, शरद पवार भाजपसोबत आले असते. तर ते आज देशाचे राष्ट्रपती झाले असते, असे म्हणत आताही पवारांचे स्वागतच आहे, असे म्हटले होते. त्यांचे हे वक्तव्य म्हणजे थेट शरद पवार यांना राष्ट्रपती पदाची ऑफरच भाजपने दिल्याची आता बोलले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.