ऑनलाइन लॉटरी आणि ऑनलाइन जुगार बंद करावेत, अशी मागणी ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. यावरून भाजप आमदार नितेश राणे आक्रमक झाले आहेत. राऊतांनी असे पत्र अचानक लिहिण्याचे कारण काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यावेळी येणारी लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून हप्ते गोळा करण्याचा ठाकरे गटाचा हेतू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. एवढेच नाही तर कंपन्यांना धमकावून खंडणी गोळा करण्याचा ठाकरे गटाच्या नेते मंडळींचा धंदा असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.
मुंबईसह राज्यात 'ऑनलाइन लॉटरी'च्या दुकानांचा धंदा तेजीत आहे. अशा दुकानांत युवामंडळी मोठ्या प्रमाणात जुगार खेळताना दिसतात. जुगाराचे हे अड्डे बेकायदेशीरपणे चालवले जातात. यात मराठी कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. म्हणूनच ऑनलाइन लॉटरीची दुकाने बंद करावेत, अशी मागणी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून केली आहे.
लॉटरी रेग्युलेशन अॅक्ट 2010 चे संपूर्ण उल्लंघन करून राज्यात ऑनलाइन लॉटरीची दुकाने सुरू आहेत. याविरोधात कारवाई टाळण्यासाठी महिन्याला अंदाजे 100 कोटींचा हप्ता वित्त विभाग, गृहविभागापर्यंत म्हणजे सरकारपर्यंत पोहोचवला जाते, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
वित्त विभाग आणि गृहविभागाशी याबाबत मध्यस्थी करण्याचे काम गुजरात निवासी मंगलभाई नावाचा दलाल करतो. राज्यात बेकायदेशीर ऑनलाइन लॉटरी जुगाराची वार्षिक उलाढाल 30 हजार कोटींपेक्षा जास्त असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
यावरून भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ठाकरे गटालाच लक्ष्य केले आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) तोंडावर पत्र लिहिण्यामागे कंपन्यांना धमकी देऊन त्यांच्याकडून खंडणी गोळा करण्याचा ठाकरे गटाच्या नेत्यांचा धंदा असल्याचा आरोप राणे यांनी केला आहे. याबाबत कुणाला कुठून कसे फोन गेले आहेत, पैसे न दिल्यास कारवाईसाठी भाग पाडू, असे फोन केल्याचे रेकॉर्डिंग असल्याचा दावा करून ते लवकरच जाहीर करणार असल्याचे नितेश राणे यांनी स्पष्ट केले.
एवढेच नाही तर हे हप्ते सरकारकडे जात आहेत, की संजय राऊतला हप्ते 'मातोश्री'वर जमा करायचे आहेत, असा सवाल नितेश राणे यांनी केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मोदी-शाह यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही महाराष्ट्रात भाजपसोबत (BJP) आलो आहोत. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी आमचा विश्वासघात करत केसाने गळा कापू नये, अन्यथा माझेही नाव रामदास कदम आहे, असा इशारा काल शिवसेनेचे रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी दिला. त्यावर कदम हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या भावना व्यक्त करण्याचे त्यांना अधिकार आहेत. ते वरिष्ठांशी बोलतील, अशी सौम्य भूमिका नितेश राणे यांनी घेतली. अनेकांच्या मनात लाडू फुटले आहेत तरीही महायुती म्हणून आम्ही एकत्र काम करणार, असा दावाही त्यांनी केला.
महाविकास आघाडी (MVA) नावाचा पोपट मेलेला आहे. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) पहिल्या दिवसापासून सकारात्मक आहेत. तरीही आघाडीचे लोक त्यांचा अपमान करत आहेत. म्हणून प्रकाश आंबेडकर लवकरच भूमिका जाहीर करतील, असा दावा नितेश राणे यांनी केला. त्याचवेळी ठाकरे गट महाविकास आघाडीसोबत राहील का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
(Edited by Avinash Chandane)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.