Sindhudurg News : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग येथे पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी विविध राजकीय घटनांवर भाष्य केले, तर विनायक राऊत यांना टीकेचे लक्ष्य करत काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना सबुरीचा सल्ला दिला. राज ठाकरे यांसारखे हिंदुत्ववादी विचारांचा कडवट नेते आमच्यासोबत येत असतील, तर त्यांचं स्वागतच करायला पाहिजे, अशा शब्दांत राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली. शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे. ते जर सोबत येत असतील तर त्यात काही आश्चर्य वाटायला नको, असेही नितेश राणे यांनी सांगितले.
शरद पवारांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या गटाचा बडा नेता भाजपच्या वाटेवर आहे. त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच नाव आहे, अशी चर्चा सध्या सुरू आहे. याबाबात नितेश राणे यांना विचारणा करण्यात आली. या वेळी ते म्हणाले, 'आदरणीय नरेंद्र मोदीसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्षात प्रवेश होत आहेत. आज आपल्या भारत देशामध्ये मोदींचीच गॅरंटी चालते. लोक ते स्वीकारतात आणि याच्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.
म्हणून कुठल्या पक्षातला कुठला बडा नेता भाजपमध्ये येऊ पाहतोय, हे ऐकल्यावर आश्चर्य वाटत नाही. कारण प्रत्येकाला कळून चुकले आहे, की राहुल गांधी यांचे नेतृत्व अपयशी ठरले आहे. राहुल गांधींचे मोहब्बतचे दुकान आता खाली होणार असून, ते नफरतचे दुकान आहे. मोदींच्याच नेतृत्वाखाली भारत देश विकास करू शकतो. त्यामुळे भाजपमध्ये येणाऱ्यांची रांग वाढत चालली आहे. त्यामुळे आश्चर्य वाटत नाही, असे राणे म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
तुमचा आणि आमचा बॉस एकच...
लवकरच तुमचा आणि आमचा बॉस एकच असेल आणि महाविकास आघाडी काळात वसुली करताना पोलिसांची काळजी वाटली नाही का? अस एक ट्विट नितेश राणे यांनी केले आहे. त्यावर ते म्हणाले, विजय वडेट्टीवार यांनी माझ्या भाषणावर आक्षेप घेतला. महिलांचा अपमान केला, त्यांना धमक्या दिल्या, असा आरोप केला आहे. हे कोण बोलतंय, महाविकास आघाडीच्या काळात विजय वडेट्टीवार मंत्री होते आणि त्यावेळी पोलिस वसुलीसाठी वापरले जायचे. ते वडेट्टीवार पोलिसांबद्दल आम्हाला ज्ञान देत आहेत.
महाविकास आघाडीच्या काळात पोलिस उद्धव ठाकरेंचे घरगडी म्हणून वापरले जायचे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केला आहे. त्यामुळे त्यांनी पोलिसांची काळजी घेऊ नये, असे राणे म्हणाले. तसेच वडेट्टीवार हे आमचे जुने सहकारी असून, हिंदुत्ववादी विचाराचे आहेत. बाळासाहेबांच्या तालमीमध्ये तयार झाले आहेत. तसेच राणेसाहेबांचे जुने सहकारी आहेत. मी त्यांना फक्त एवढाच सल्ला दिला जास्त टोकाची भूमिका आमच्याबद्दल घेऊ नका. कदाचित येणाऱ्या काळात त्यांचा आणि आमचा बॉस सागर बंगल्यावरती बसलेला असेल, एवढी काळजी घेऊन आमच्यावर टीका करावी, असा सबुरीचा सल्ला त्यांनी दिला.
विनायक राऊत ठरले टीकेचे लक्ष्य...
पंकजा मुंढे आणि देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत भेट झाली. त्यावर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत म्हणाले, आता भेट घेऊन काय उपयोग. बाहेरच्यांना घेऊन आता पदे दिली गेली आहेत. त्यावर राणे म्हणाले, विनायक राऊतांची वयोमानामुळे कदाचित स्मरणशक्ती कमी होत असेल. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात किती शिवसैनिकांना मंत्रिपदे दिली. याची यादी जरा दाखवा. त्यावेळी तुम्ही बाहेरून आलेल्यांना मंत्रिपदे दिली, कडवट शिवसैनिकांना पदे दिली का ? असा सवाल राणे यांनी या वेळी व्यक्त केला. विनायक राऊत यांनी स्वतःच्या बुडाखाली लागलेली आग विजवावी, मग आमच्यावर टीका करावी, असा टोला त्यांनी लगावला.
नीलेश राणे यांची गुहागरमधील सभा आक्रमक नव्हती, तर तेथे विकृती पाहावयास मिळाली, अशी टीका विनायक राऊत यांनी नीलेश राणे यांच्यावर केली होती. यावर नितेश राणे म्हणाले, विकृतीचं उत्तम दर्शन हे कणकवलीची सभा होती. ज्या भाषेमध्ये त्यांचे पक्षप्रमुख, नेते भाषण करून गेले आणि त्यांनी जी पातळी सोडली त्याला विकृती म्हणतात. म्हणून विनायक राऊतांनी आरशात बघून टीका केली असती तर बरं झालं असतं. विकृती काय म्हणतात हे उद्धव ठाकरे यांची कणकवलीतील सभा आहे. स्वत:चं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही त्यांची पद्धत आहे, असे राणे म्हणाले.
राज ठाकरे यांचे स्वागतच...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे आशिष शेलार यांची भेट झाली. सुमारे तासभर झालेली ही भेट राजकीय असल्याचे बोलले जात आहे. त्यावर राणे म्हणाले, राज ठाकरे यांचा मित्र परिवार मोठा आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. ते राणेसाहेबांनाही भेटले, फोनवरून चर्चा अनेकदा केली. ते आता आशिष शेलार यांना भेटले आहेत. जर हिंदुत्वाचा विचार असलेले एकत्र आले तर चांगलंच होईल. राज साहेबांसारखे हिंदुत्ववादी विचारांचे कडवट नेते आमच्यासोबत येत असतील, तर त्यांचं स्वागतच करायला पाहिजे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.