

By, निखिल मेस्त्री, पालघर बातमीदार
Palghar Relief Hospital case six accused bail rejected : पालघरच्या रिलीफ रुग्णालयातील राडा प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 23 आरोपींपैकी जामिनासाठी अर्ज केलेल्या सहा जणांना मंगळवारी न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही.
प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी सुजाता बांदल यांनी सहाही आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले. त्यामुळे या प्रकरणातील सर्व 23 आरोपी पुन्हा न्यायालयीन कोठडीतच राहणार आहेत.
डॉक्टरांना मारहाण केल्याच्या प्रकरणातील डोंबिवलीतील एकनाथ शिंदे शिवसेनेचे (Shivsena) नगरसेवक रमेश म्हात्रे यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पालघर न्यायालयात या सहा आरोपींच्या जामीन अर्जावर निर्णय झाला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपींच्या कथित भूमिकेसह तपासाची सद्यःस्थिती आणि उपलब्ध पुराव्यांचा विचार केला. त्यानंतर सहाही जामीन अर्ज फेटाळण्यात आले.
जामीन नाकारण्यात आलेल्यांमध्ये आमदारपुत्र रोहित राजेंद्र गावीत, राहुल संखे, मनीष ऊर्फ विकी संखे, ऋषभ वारे, साईराज पाटील आणि नीलम संखे यांचा समावेश आहे. रोहित गावित आणि ऋषभ वारे यांनी 18 सप्टेंबरला जामिनासाठी न्यायालयात (Court) अर्ज दाखल केला होता. त्यानंतर मनीष संखे, साईराज पाटील आणि राहुल संखे यांनी 19 सप्टेंबरला, तर नीलम संखे यांनी 21 सप्टेंबरला अर्ज केला. या अर्जांवर 23 आणि 24 सप्टेंबरला दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद करण्यात आला होता.
तपास अधिकारी तथा पोलिस उपअधीक्षक निशा जाधव यांनी आरोपींना जामीन देण्यास विरोध केला. तपास अद्याप सुरू असून आरोपींची कथित भूमिका, उपलब्ध पुरावे आणि तपासाची सद्यःस्थिती लक्षात घेता जामीन मंजूर करू नये, अशी भूमिका सरकारी पक्षाने मांडली. आरोपींच्या वकिलांनी मात्र जामिनासंदर्भातील कायदेशीर तरतुदी, तपासाची प्रगती आणि आपल्या अशिलांची कथित भूमिका याबाबत न्यायालयासमोर विविध मुद्दे मांडले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर सोमवारी निकाल अपेक्षित होता. मात्र रुग्णालयाच्यावतीने रमेश म्हात्रे यांच्या प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भ न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर निर्णय मंगळवारपर्यंत पुढे ढकलण्यात आला.
रिलीफ रुग्णालयातील राडा, कर्मचाऱ्याला मारहाण, शिवीगाळ आणि धमकीप्रकरणी 6 सप्टेंबरला पालघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर शिवसेनेचे 11 पदाधिकारी आणि गोविंदा पथकातील 12 जण, अशा एकूण 23 आरोपींना अटक करण्यात आली. सुरुवातीला सर्व आरोपी पोलिस कोठडीत होते. एका आरोपीला 16 सप्टेंबरला, तर उर्वरित 22 आरोपींना 18 सप्टेंबरला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आता सहाही जामीन अर्ज फेटाळल्याने सर्व 23 आरोपी न्यायालयीन कोठडीतच आहेत. जामिनासाठी पुढील कायदेशीर पर्याय म्हणून वरिष्ठ न्यायालयात धाव घेण्याचा मार्ग त्यांच्यासमोर आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.