

वसंत जाधव
Panvel Municipal Election : पनवेल महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता कायम राखली असली, तरी सध्या शहराच्या राजकारणाचे लक्ष महापौरपदाच्या निवडीकडे केंद्रित झाले आहे.
नुकतीच महायुतीच्या गटनेतेपदी नितीन पाटील यांची सर्वानुमते निवड झाल्यानंतर, महापौरपद त्यांच्याच गळ्यात पडणार का? की पक्षांतर्गत राजकीय गणितांमुळे वेगळाच चेहरा पुढे येणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
जिल्हा परिषद निवडणुकांचा प्रचार सुरू असल्याने भाजपने महापौरपदाची घोषणा जाणीवपूर्वक लांबवली असून, निकालानंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे पनवेलमध्ये राजकीय चर्चांना उधाण आले आहे. महायुतीच्या (Mahayuti) गटनेतेपदी नितीन पाटील यांची निवड झाल्यानंतर कोकण आयुक्त कार्यालयात महायुतीची अधिकृत गटनोंदणी करण्यात येणार आहे. त्यानंतर 10 फेब्रुवारीला महापौर आणि उपमहापौर पदांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.
पनवेलच्या महापौरपदाची माळ अखेर कोणाच्या गळ्यात पडते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. 2017 निवडणुकीनंतर भाजपने (BJP) अपेक्षांना धक्का देत डॉ. कविता चौतमोल यांना महापौरपदाची संधी दिली होती. त्या वेळी आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर यांची भूमिका निर्णायक ठरली होती. यावेळीही महापौर निवडीची सूत्रे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हाती असली, तरी पडद्यामागे विविध राजकीय डावपेच सुरू असल्याची चर्चा आहे.
गटनेतेपदी निवड झाल्यामुळे नितीन पाटील यांचे नाव महापौरपदासाठी आघाडीवर असले, तरी भाजपकडून अधिकृत घोषणा न झाल्याने अनिश्चितता कायम आहे. शेकापमधून भाजपमध्ये आलेल्या नितीन पाटील यांचा 2017 मध्ये शेकापचे तत्कालीन नगरसेवक प्रितम म्हात्रे यांच्यासोबत वाद झाला होता. हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले होते. त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत शेकापच्या चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या प्रितम म्हात्रे यांनी नितीन पाटील यांचा पराभव केला होता. मात्र आमदार ठाकूर यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या नितीन पाटील यांना नंतर स्वीकृत नगरसेवक म्हणून सभागृहात स्थान देण्यात आले. त्यानंतर त्यांनी सातत्याने सभागृहात भाजपची भूमिका प्रभावीपणे मांडली. याच पार्श्वभूमीवर त्यांच्यावर जिल्हा सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.
दरम्यान, शेकापमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या प्रितम म्हात्रे यांच्या पत्नी ममता म्हात्रे या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे ममता म्हात्रे यांनाच महापौरपदाची संधी मिळावी, यासाठी म्हात्रे कुटुंबीयांकडून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. प्रितम म्हात्रे यांचे वडील जे. एम. म्हात्रे हे माजी खासदार रामशेठ ठाकूर तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय असल्याने या समीकरणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने उरणचे आमदार महेश बालदी यांच्याकडे पनवेल महापालिका निवडणुकीची सूत्रे दिली आहेत. त्यामुळे महापौरपद जर म्हात्रे कुटुंबाकडे दिल्यास प्रितम म्हात्रे पनवेलमध्येच सक्रिय राहतील आणि उरण विधानसभा मतदारसंघातील दावेदारी कमी होईल, अशीही एक राजकीय खेळी असल्याची चर्चा आहे. मात्र यामुळे भविष्यात पनवेल विधानसभा क्षेत्रात आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासमोर नव्या स्पर्धकाची निर्मिती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याशिवाय, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निकटवर्तीय असलेल्या अस्मिता घरत आणि प्रतिमा भोईर, या दोन महिला नगरसेविकांची नावेही महापौरपदासाठी चर्चेत आहेत. पक्षसंघटन, निष्ठा आणि स्थानिक पातळीवरील अनुभव लक्षात घेता या दोघींपैकी एकीच्या नावालाही पसंती दिली जाऊ शकते, अशी चर्चा भाजपच्या गोटात आहे.
दरम्यान, नव्याने पक्षात प्रवेश केलेल्याला थेट महापौरपद दिल्यास भाजपमधील दोन वेळा निवडून आलेले अनुभवी व उच्चशिक्षित नगरसेवक नाराज होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ‘नुकताच प्रवेश आणि थेट महापौर’ असा संदेश गेल्यास पक्षांतर्गत असंतोष वाढू शकतो. त्यामुळे सध्याचा निर्णय घेताना भविष्यातील राजकीय समीकरणांचा विचार करून भाजपचे वरिष्ठ नेते सावध भूमिका घेत असल्याचे दिसून येते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.