Raigad ZP Result : भाजपची त्सुनामी! पनवेलमध्ये शेकापचा बालेकिल्ला उद्ध्वस्त; आठही जिल्हा परिषद गटात भाजपचा झंझावात

panvel zilla parishad panchayat samiti election result : पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपने शेतकरी कामगार पक्षाला क्लीन स्वीप देत निर्णायक वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
Local-Body-Elections
Local-Body-ElectionsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  • पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत आठही गटांमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले.

  • पंचायत समितीमध्ये केळवणे गण वगळता सर्व गणांवर भाजपने वर्चस्व मिळवले.

  • या निकालामुळे शेतकरी कामगार पक्षाची पनवेलवरील दीर्घकाळची राजकीय पकड संपुष्टात आली आहे.

panvel : वसंत जाधव

शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने निर्णायक वर्चस्व प्रस्थापित केले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत पनवेल तालुक्यातील आठही गटांमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले असून, पंचायत समितीत केळवणे गण वगळता इतर सर्व गणांमध्ये भाजपने विजय मिळवला आहे. त्यामुळे पनवेल तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवरील शेतकरी कामगार पक्षाची दीर्घकाळची पकड सुटल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.

मागील निवडणुकीत जिल्हा परिषदेत केवळ दोन गटांपुरते मर्यादित असलेले भाजपचे यश यावेळी सहा गटांनी वाढले आहे. त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेसाठी पनवेल तालुक्याने भाजपला शंभर टक्के योगदान दिले आहे. पनवेल महानगरपालिकेनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरही भाजपचे वर्चस्व निर्माण झाले आहे. वावंजे, नेरे, पाली देवद, पळस्पे, वावेघर, वडघर, गव्हाण आणि केळवणे या सर्व जिल्हा परिषद गटांमध्ये भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. आठही जागा भाजपच्या पारड्यात टाकत पनवेलकरांनी रायगड जिल्हा परिषदेतील सत्तासमीकरणे बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विशेष म्हणजे अनेक वर्षांनंतर पनवेल तालुका पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकला आहे.

या निकालामुळे पंचायत समितीतून शेतकरी कामगार पक्ष पुढील पाच वर्षांसाठी बाहेर राहणार आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने शेकापची अनेक वर्षांची मक्तेदारी मोडीत काढली आहे. मतदारांनी भाजपला दिलेल्या कौलामुळे विरोधकांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.

Local-Body-Elections
Local body elections: झेडपी निवडणुकीत मराठवाड्यात पुन्हा महायुतीची सरशी? कोठे, कोणाची सत्ता? काय सांगतात एक्झिट पोलचे आकडे

वावंजे जिल्हा परिषद गट वगळता खटारा चिन्हावरील उमेदवारांना बहुतांश ठिकाणी भाजपविरोधात प्रभावी टक्कर देता आली नसल्याचे निकालांवरून दिसून आले आहे. गव्हाण आणि वडघर या जिल्हा परिषद गटांमध्ये भाजपचा विजय होईल, हे आधीचे अंदाज निकालातून खरे ठरले आहेत. त्याचप्रमाणे पाली देवद आणि नेरे या गटांमध्येही भाजपने आपली बाजी कायम ठेवली आहे.

नेरे जिल्हा परिषद गटात आत्माराम बाळू भस्मा आणि मारुती बाळू भस्मा या दोन सख्ख्या भावांमध्ये थेट लढत झाली. भाजपकडून निवडणूक लढवणाऱ्या आत्माराम भस्मा यांनी आपल्या भावाचा सुमारे पाच हजार मतांनी पराभव केला. ही लढत तालुक्यातील सर्वाधिक चर्चेतील लढतींपैकी एक ठरली होती. वावंजे जिल्हा परिषद गटात कमला देशेकर यांनी शेकापच्या लता म्हात्रे यांचा सुमारे एक हजार मतांनी पराभव केला. या दोन्ही गटांतील लढती तुल्यबळ ठरल्या होत्या.

पंचायत समिती निवडणुकीतही अनेक ठिकाणी लक्षवेधी लढती पाहायला मिळाल्या. करंजाडे पंचायत समिती गणात भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण भगत यांच्या कन्या रंजना वासकर या निवडणूक रिंगणात होत्या. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा साडेतीन हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. पळस्पे पंचायत समिती गणात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेंद्र पाटील यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विक्रम घरत यांचा सुमारे पावणेचार हजार मतांनी पराभव केला.

केळवणे पंचायत समिती गणात मात्र भाजपला अपयश आले. भाजपच्या शितल माळी यांचा मशाल चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या वैदही घरत यांनी पराभव केला. केळवणे गणातील या निकालामुळे विरोधकांवरील पूर्ण वॉश काही अंशी टळला आहे. एकूणच, पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल हे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्तांतराचे स्पष्ट संकेत देणारे ठरले आहेत. पनवेल तालुक्यातील शहरीकरण, नव्या वसाहती, वाढती लोकसंख्या आणि बदलती मतदारांची मानसिकता या घटकांचा परिणाम या निकालांवर दिसून आला आहे.

जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पार्टीने जो विजय मिळवला आहे. हा जो ऐतिहासिक विजय जनतेने आम्हाला मिळवून दिला आहे. त्याचे सर्व श्रेय हे पनवेल तालुक्यातील जनतेचे आहे. केंद्रामधील आणि राज्यांमध्ये नेत्यांनी जे काम केलेले आहे त्या कामाची पोचपावती जनतेने विजयाच्या रूपात आम्हाला दिली आहे. पनवेल मधील सर्व मतदारांचे आभार व नवनिर्वाचित उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन.

प्रशांत ठाकूर, आमदार पनवेल विधानसभा

Local-Body-Elections
Local body election Punjab : हायकोर्टाकडून 100 हून अधिक नगरपरिषदांच्या निवडणुकांना स्थगिती; नेमकं काय घडलं?

FAQs :

1. पनवेल जिल्हा परिषद निवडणुकीत कोणाचा विजय झाला?
भारतीय जनता पक्षाने सर्व आठ गटांमध्ये विजय मिळवला.

2. पंचायत समितीत भाजपला किती जागा मिळाल्या?
केळवणे गण वगळता इतर सर्व गणांमध्ये भाजप विजयी झाला.

3. या निकालाचा सर्वात मोठा फटका कोणाला बसला?
शेतकरी कामगार पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे.

4. पनवेल तालुक्यासाठी हा निकाल का महत्त्वाचा आहे?
कारण शेतकरी कामगार पक्षाचा पारंपरिक बालेकिल्ला भाजपने जिंकला आहे.

5. या निकालामुळे पुढील राजकारणावर काय परिणाम होईल?
पनवेलमधील स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपचे दीर्घकालीन वर्चस्व प्रस्थापित होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com