

Ratnagiri News : तीन वर्षे उपसरपंच आणि पाच वर्षे सरपंच म्हणून जबाबदारी सांभाळलेली असतानाही २००२ च्या मतदार यादीतून नाव गायब झाले आहे, अशी तक्रार जयगडचे माजी सरपंच अनिरुद्ध कमलाकर साळवी यांनी तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे अर्जाद्वारे केली आहे.
सध्या निवडणूक आयोगातर्फे ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत २००२ च्या मतदार यादीची पडताळणी करताना जयगड येथील रहिवासी अनिरुद्ध साळवी यांचे नाव यादीत नसल्याची बाब पुढे आली आहे. विशेष म्हणजे, साळवी यांचा विवाह जुलै २००० मध्ये झाला असून, त्यांच्या पत्नीचे नाव २००२च्या मतदार यादीत समाविष्ट आहे; परंतु स्वतः साळवी यांचे नाव मात्र गायब आहे.
अनिरुद्ध साळवी यांनी १९९६ ते १९९९ या काळात ग्रुपग्रामपंचायत जयगडचे सदस्य व उपसरपंच म्हणून काम पाहिले. त्यानंतर १९९९ ते २००४ या कालावधीत सलग पाच वर्षे त्यांनी जयगडचे सरपंच म्हणून जबाबदारी सांभाळली. पुढे २००९ ते २०१४ या काळात पुन्हा ते निर्वाचित सदस्य म्हणून कार्यरत होते. सुमारे तीन टर्म (१३ वर्षे) ग्रामपंचायतीच्या कार्यकारिणीत कार्यरत राहून अनेक नवमतदारांची नोंदणी करणाऱ्या लोकप्रतिनिधीचे नावच शासकीय यादीतून गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शासकीय कर्तव्यात कसूर करणाऱ्या आणि या गहाळ प्रकरणाला जबाबदार असणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी. तसेच माझे नाव गायब कसे झाले, याचा शोध घेऊन केलेली कार्यवाही लेखी स्वरूपात कळवावी, अशी मागणी साळवी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
ते म्हणाले, ‘माझ्या स्वर्गवासी आईचे नाव तत्कालीन यादीत असल्याने बीएलओकडून मॅपिंगदरम्यान माझे नाव राहू शकले; अन्यथा मला अत्यंत गुंतागुंतीच्या आणि वेळखाऊ प्रक्रियेला सामोरे जावे लागले असते, असे त्यांनी सांगितले. २००२ची मतदार यादी अत्यंत सदोष असून, यामुळे अनेक सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.