

Ratnagiri News : रत्नागिरीत सध्या राजकीय कलगीतुरा चांगलाच रंगला असून, महायुतीमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. रत्नागिरीतील शासकीय रुग्णालयातील डॉक्टर कपातीवरून भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी केलेल्या टीकेवर पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मंत्री सामंत यांनी विकासाची कामे करणे ही महायुतीतील सर्वांची सांघिक जबाबदारी आहे. मात्र, काही लोक केवळ सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून मनोरंजन करत आहेत, अशा शब्दांत जठार यांचे कान टोचले.
रत्नागिरीतील शासकीय रुग्णालयातील डॉक्टर कपातीवरून बोलताना मंत्री सामंत म्हणाले, भाजपचे आमदार प्रमोद जठार यांनी काही दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाला भेट दिली होती. तिथल्या व्यवस्थेची पाहणी केल्यानंतर रत्नागिरीत डॉक्टरांची कपात झाली असल्याचे माध्यमांसमोर मांडले. आमदार जठार यांच्या या विधानाचा समाचार घेत पालकमंत्री सामंत यांनी त्यांना टोला हाणला.
पालकमंत्री सामंत म्हणाले, कोणीतरी अकलेचे दिवे लावले आणि रत्नागिरीत डॉक्टरांची कपात असल्याचे सांगितले. पण प्रत्यक्षात अशी कोणतीही कपात झालेली नाही. उलट, रत्नागिरीतील शासकीय मेडिकल कॉलेज हे महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाचे कॉलेज आहे. महायुतीचे सरकार काम करताना अशा प्रकारे विरोधक असल्यासारखे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करून मनोरंजन करणे, हे आघाडीसाठी अत्यंत घातक आहे.
मतदारसंघात एखादी चांगली आणि विधायक गोष्ट घडत असेल, तर त्यातील अडचणी नागरिकांसमोर आणून वातावरण बिघडवण्यापेक्षा, यंत्रणा किती सक्षमपणे काम करते आहे हे सांगणे गरजेचे आहे. सरकारकडून निधी आणून जर विकासकामे होत असतील तर त्याचे कौतुक झालेच पाहिजे, पण चांगल्या कामात खोडा घालणे हे महायुतीतील नेत्यांचे काम नाही.
राजकारणात खिलाडूवृत्ती असावी
मंत्री सामंत यांनी माजी खासदार अनंत गीते यांचे उदाहरण देत राजकारणातील खिलाडूवृत्तीची आठवण करून दिली. ते म्हणाले, गीते खासदार असताना मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा आमदार होतो. तरीही त्यांनी माझ्या गावातील ग्रामदैवतेच्या रस्त्यासाठी १० लाखांचा निधी दिला. त्या वेळी कोणतीही राजकीय स्पर्धा झाली नाही की त्यांनी भूमिपूजनाचा हट्ट धरला नाही. विकासकाम करताना एकमेकांना सोबत घेऊन गेल्यास कामे नीट आणि दर्जेदार होतात, हेच गीतेंच्या उदाहरणावरून स्पष्ट होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.