Shiv Sena leader Deepak Kesarkar Attacks on Aditya Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज (रविवारी) सांयकाळी खेड येथे सभा होत आहे. या सभेत शिंदे हे माजी मुख्यमंत्री, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर देणार असल्याची चर्चा आहे.
यानिमित्ताने दोन दिवसापासून ठाकरे गट-शिंदे गट यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. शिवसेनेचे नेते, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज या सभेच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी केसरकरांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. ते माध्यमांशी बोलत होते.
राज्यात सत्तातर झाल्यानंतर ठाकरे गटाचे नेते शिंदे गटाला 'खोके सरकार' म्हणून हिणवत असतात, त्याला केसरकरांनी उत्तर दिले. ते म्हणाले, " आमच्यावर खोके घेतल्याचे आरोप उद्धव ठाकरे करतात. मात्र, आदित्य ठाकरे यांनाच लहानपणापासून खोक्यांशी खेळण्याची सवय आहे,"
"उद्धव ठाकरे शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या विचारांपासून दूर गेले. कोकणी माणसाने शिवसेनेला प्रचंड प्रेम दिले. मात्र, त्याबदल्यात उद्धव ठाकरेंनी कोकणाला काहीही दिले नाही. सिंधूरत्न योजनेसाठी उद्धव ठाकरेंनी केवळ 25 कोटींची तरतूद करुन जखमेवर मीठ चोळले," असे केसरकर म्हणाले.
"ठाकरे यांनी सहानुभूती मिळवण्यासाठी खेडमध्ये सभा घेऊन त्यांनी आमच्यावर वाट्टेल ते आरोप केले. मात्र, मी कुणाबद्दल वाईट बोलणार नाही. तरीही कोकणातील जनतेने वस्तुस्थितीची खात्री केलीच पाहिजे. उद्धव ठाकरेंनी कोकणी माणसाकडे दुर्लक्ष केले," असे केसरकर म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी खेडच्या गोळीबार मैदानावर जाहीर सभा घेतली होती. या सभेमधून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांवर निशाणा साधला होता. त्यामुळे याला प्रत्युत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील याच गोळीबार मैदानावर आज सभा होणार आहे. संध्याकाळी ५ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या सर्व नेत्यांच्या, आमदारांच्या आणि खासदारांच्या उपस्थितीत ही सभा घेण्यात येणार आहे.
शिवसेनेचे रामदास कदम यांचा बालेकिल्ला असलेल्या खेडमध्ये उद्धव ठाकरे यांनी सभा घेण्याआधीच रामदास कदम यांच्याकडून आजच्या सभेची घोषणा करण्यात आलेली होती. त्यामुळे या सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह रामदास कदम देखील नेमकं काय बोलणार आहेत? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.