सिंधुदुर्ग : भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची जामिनावर सुटका झाली आहे. राणेंची सुटका होताच कोकणातील वातावरण पुन्हा तापले आहे. पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडू लागला आहे. शिवसेना (Shivsena) नेते व सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत (Satish Sawant) यांनी पुन्हा राणेंना डिवचले आहे. न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर राणे आजारी पडले, असा टोला सावंतांनी लगावला आहे. (Nitesh Rane Updates)
सतीश सावंत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राणेंवर तोफ डागली. ते म्हणाले की, संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणेंची सशर्त जामिनावर सुटका झाली आहे. अजून खटल्याचा निकाल लागलेला नाही. अशा परिस्थितीत त्यांचा कार्यकर्त्यांकडून सत्कार आणि स्वागताचा कार्यक्रम सुरू आहे. हा प्रकार म्हणजे सुसंस्कार संपत चालल्याचे दाखवणारा आहे. विकासाच्या मुद्द्याऐवजी नितेश राणेंनी इतर मुद्द्यांवर राजकारण सुरू केले आहे.
नितेश राणे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर ते आजारी पडले. तुरुंगात न जाण्यासाठीच नितेश राणेंचे दुखणे होते, असा टोला लगावून सावंत म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा हा सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व राजकीयदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण राहिला आहे. अप्पासाहेब पटवर्धन यांच्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तीच्या पदस्पर्शाने संस्कारीत झालेली ही भूमी आहे. या भूमीत घडत असलेल्या राजकीय घटना पाहता जिल्ह्यातील जनतेने जागे व्हायला हवे. न्यायदेवतेसमोर सगळे समान असतात. नितेश राणे प्रकरणात हे दिसून आले आहे. राणेंची चुकीच्या गोष्टींशी काही संबंध नसेल तर त्यांनी घाबरायचे काहीच कारण नाही. सिंधुदुर्गातील जनता सुज्ञ असून, ती योग्य वेळ न्याय करेल. विचारांची लढाई विचारांनीच लढायला हवी. खून, मारामारी, दहशत पसरवणे चुकीचे आहे.
नारायण राणे हे केंद्रीय मंत्री असूनही जिल्ह्यातील जनतेची त्यांना काळजी नाही. त्यांना फक्त त्यांच्या कुटुंबाची काळजी आहे. संतोष परब यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्याचे सौजन्यही नारायण राणेंनी दाखवले नाही. नितेश राणे हे आता सुधारतील, अशी अपेक्षा होती. मात्र, ते सुधारलेले नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर त्यांनी टीका केली आहे. त्यांनी आता तोंड उघडावेच, मग त्यांना कळेल की कुणाचा रक्तदाब वाढतो, असेही सावंत यांनी सांगितले.
नितेश राणेंना या जामीन मंजूर करतानाही न्यायालयाने काही अटी घातल्या आहेत. न्यायालयाने राणेंना कणकवली तालुक्यात येण्यास बंदी घातली आहे. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली सोडून ते कुठेही येऊ शकतात. या प्रकरणी आरोपपत्र दाखल होईपर्यंत ते कणकवलीत येऊ शकत नाहीत. आठवड्यातून एकदा तपासासाठी त्यांना ओरोस पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागेल, अशाही अटी न्यायालयाने घातल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.