

Chiplun News : नुकताच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहण्याचा विक्रम मोडला. नेहरू 4,398 दिवस पंतप्रधान पदावर कार्यकरत होते. तर पंतप्रधान मोदी यांनी 4,399 दिवस पूर्ण करून हा विक्रम मोडला. यानंतर आता भाजपकडून विक्रम मोडल्याचा दावा करत पंडित नेहरू आणि मोदी यांच्यात तुलना केली जात आहे. एकीकडे आरोप होत असतानाच विरोधकांकडून यावरून टीका होताना दिसत आहे.
दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव यांनी यावरून भाजपला टोला लगावला आहे. तसेच भाजपला शह द्यायचा असेल तर विरोधी पक्षांनी पंतप्रधानपदासाठी एखाद्या 'महिलेचे' नाव समोर आणण्याची गरज आहे. तसेच झाल्यास देशाच्या राजकारणात मोठा चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही, असे मोठे विधान केलं आहे. तसेच हा चेहरा पंतप्रधान म्हणून आपल्या समोर आहे. मात्र त्या त्याबद्दल आताच बोलणे योग्य नाही, असे म्हणत सस्पेन्स वाढवला आहे. ते चिपळूण येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी देशातील वाढती महागाई, बेरोजगारी आणि महायुतीमधील अंतर्गत वाद यावरून केंद्र आणि राज्य सरकारवर त्यांनी निशाना साधत जोरदार हल्लाबोल केला. भाजपनेच एकनाथ शिंदेंच्या जागांवर बंडखोर उभे केले म्हणत बंडखोर उभे करणे ही भाजपची जुनी रीत असून जिथे जिथे शिंदेंनी उमेदवारी दिली, तिथे भाजपने बंडखोर उमेदवार उभे केले. शिंदेंना 17 पैकी 10 जागा पाहिजे होत्या. पण ते नंतर 7 वर आले आणि पदरात पाडल्या केवळ 4 जागा. त्यातही त्या निवडून आल्या तर तेही आमच्यामुळेच असा दावाही भाजप करेल असा दावा भास्कर जाधव यांनी केला आहे.
तसेच यावेळी भास्कर जाधव यांनी भाजपच्या दाव्याची हवा काढत अभिनेते राजेश खन्ना यांचा प्रसिद्ध डायलॉग मारला. "बाबू मोशाय, जिंदगी बडी होनी चाहिये... लंबी नही! यामुळे फक्त दिवस मोजून कोणाचे कर्तृत्व सिद्ध होत नाही. तर त्या खुर्चीवर बसून आपल्या कारकिर्दीत देशवासीयांना काय सुख आणि आनंद दिला हे पाहायला हवं. याचेच आता पंतप्रधान आणि सरकार यांनी मूल्यमापन करायला हवं असाही टोला भास्कर जाधव यांनी लगावला आहे.
तसेच आपल्या समोर लोकशाहीतील मोठे संकट ठाठले असून मतदारांचा मतदानाचा हक्कच निवडणुका बिनविरोध करून पद्धतशीरपणे संपुष्टात आणला जात आहे. तर सध्या देशात अंधभक्तांची संख्या प्रचंड वाढल्याचा टोला लगावत या अंधभक्तांना पेट्रोल, डिझेल, खत आणि नोकऱ्यांसाठी लागलेल्या रांगा दिसत नाहीत असेही खडेबोल सुनावले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.