

कुळगाव-बदलापुरात अनेक वर्षांनंतर शिवसेनेची सत्ता संपुष्टात येत भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला आहे.
हा निकाल शिंदे गटाच्या शिवसेनेसाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
अंबरनाथ आणि बदलापुराची जबाबदारी पाहणाऱ्या खासदार श्रीकांत शिंदेंसाठी हा राजकीय धक्का ठरला आहे.
Badlapur News : शर्मिला वाळुंज
कधीकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुळगाव–बदलापूर नगर परिषदेत भाजपने शिंदेंच्या शिवसेनेला जोरदार धक्का देत राजकीय समीकरणे बदलून टाकली आहेत. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या रुचिता राजेंद्र घोरपडे यांनी तब्बल ७ हजार ६३४ मतांनी दणदणीत विजय मिळवत भगवा फडकवला. घोरपडे यांना अंतिम फेरीअखेर ६४ हजार ६०४ मते मिळाली, तर शिंदे गटाच्या शिवसेनेच्या वीणा वामन म्हात्रे यांना ५६ हजार ९७० मतांवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे, नगरसेवकांची संख्या दोन्ही पक्षांची समान असतानाही नगराध्यक्षपद भाजपने खेचून आणले आहे. अंबरनाथ आणि बदलापुरातील शिवसेनेची जबाबदारी श्रीकांत शिंदे यांच्याकडे होती. त्यामुळे त्यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
पालिकेतील कथित भ्रष्टाचार आणि शिंदे गटाच्या शिवसेनेत एका कुटुंबाला दिलेल्या सहा उमेदवाऱ्या आणि भाजपचा आक्रमक व नियोजनबद्ध प्रचार यामुळे भाजपचा विजय सुकर झाल्याचे बोलले जात आहे. निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली सभा, भाजप नेतृत्वाकडून मिळालेले आर्थिक व संघटनात्मक पाठबळ याचा थेट परिणाम मतदारांवर झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
या निवडणुकीपूर्वीच बदलापूरची लढत स्पष्ट झाली होती. शिंदे गटाचे शहरप्रमुख वामन म्हात्रे आणि भाजपचे स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्यात विधानसभा निवडणुकीपासून सुरू असलेला संघर्ष या नगरपरिषद निवडणुकीत टोकाला पोहोचला. पालिकेतील कथित भ्रष्टाचार आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे वर्चस्व याला आमदार कथोरे यांनी उघड आव्हान दिले. त्याचवेळी भाजपने शिवसेनेतील काही पदाधिकाऱ्यांना गळाला लावत रणनीती आखली.
राजकीय डावपेचांत आमदार किसन कथोरे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करत शिंदे गटाच्या शिवसेनेला एकाकी पाडल्याचे चित्र दिसले. भाजपच्या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मिळालेली साथ निर्णायक ठरली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलापुरात सभा घेतली. मात्र त्याचा अपेक्षित परिणाम दिसून आला नाही.
भाजपने प्रचारात शिवसेनेचे उमेदवार वामन म्हात्रे यांना वैयक्तिक लक्ष्य करत समाजमाध्यमांवर अप्रत्यक्ष टीका केली. ‘गब्बर’ या नावाने सुरू असलेल्या प्रचाराचा सोशल मीडियावर मोठा प्रभाव दिसून आला. रावळगाव फॅक्टरीचा मुद्दा उपस्थित करत आमदार कथोरे यांनी म्हात्रे यांना कोंडीत पकडले. त्यातच म्हात्रे कुटुंबातील सहा जणांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाल्याचा मुद्दा भाजपच्या प्रचारासाठी आयता मुद्दा ठरला. अखेरच्या टप्प्यात मुख्यमंत्री फडणवीसांची सभा झाल्यानंतर बदलापुरातील राजकीय गणिते बदलल्याची चर्चा रंगली.
दरम्यान, या निवडणुकीत ‘अभूतपूर्व लक्ष्मी दर्शन’ झाल्याचीही चर्चा शहरात रंगली. उघडपणे पैसे वाटताना पकडल्याच्या घटनांनी खळबळ उडवली. भाजप नगराध्यक्ष उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचे पैसे वाटताना पकडल्याप्रकरणी दोन महिलांविरोधात गुन्हे दाखल झाले. एका मतासाठी तब्बल १० हजार रुपयांपर्यंत भाव मिळाल्याची चर्चा असून, या ‘लक्ष्मी दर्शनाचा’ मतदारांवर परिणाम झाल्याचेही बोलले जात आहे.
महाविकास आघाडीला भोपळा
या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आघाडीत असतानाही महाविकास आघाडीला एकाही ठिकाणी आघाडी घेता आली नाही. दुपारी दोन वाजेपर्यंत एकही उमेदवार विजयी किंवा आघाडीवर नव्हता. स्थानिक खासदारांची निष्क्रियता भाजपच्या पथ्यावर पडल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात उघडपणे होत आहे
दरम्यान येथील पश्चिम भागातील नवीन भेंडी पाडा परिसरात भाजपचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या संपर्क कार्यालयावर गोळीबार झाला होता. ही घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली होती. तर यानंतर अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. धक्कादायक म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अंबरनाथमध्ये जाहीर सभेच्या आधीच ही घटना घडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली होती. तर या गोळीबारात एक जखमी झाला होता.
1. कुळगाव-बदलापुरात यंदा नगराध्यक्ष कोण झाला?
यंदा कुळगाव-बदलापुरात भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला आहे.
2. या निकालाला शिंदे सेनेसाठी मोठा धक्का का मानले जात आहे?
वर्षानुवर्षे शिवसेनेचा नगराध्यक्ष असलेल्या ठिकाणी यंदा सत्ता गमवावी लागली आहे.
3. बदलापुराची राजकीय जबाबदारी कोण पाहतात?
अंबरनाथ आणि बदलापुरातील शिंदे शिवसेनेची जबाबदारी श्रीकांत शिंदे पाहतात.
4. या निकालामुळे स्थानिक राजकारणात काय बदल दिसतो?
भाजपने शिवसेनेचा बालेकिल्ला जिंकत सत्ता परिवर्तन घडवून आणले आहे.
5. हा निकाल आगामी निवडणुकांवर परिणाम करेल का?
होय, हा निकाल आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांसाठी महत्त्वाचा संकेत मानला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.