

कणकवलीतील नागवेकर खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान युवतीचा मृत्यू झाल्याने नातेवाईक व ग्रामस्थ आक्रमक झाले.
डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा आरोप करत रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली व मृतदेह रुग्णालयाच्या प्रवेशद्वारात ठेवून आंदोलन झाले.
पालकमंत्री नितेश राणेंनी मोबाईलवरून हस्तक्षेप केल्यानंतर आणि पोलीस बंदोबस्त वाढवल्याने तणाव निवळला.
Sindhudurg News : कणकवली येथील नागवेकर खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान झालेल्या युवतीच्या मृत्यूनंतर नातेवाईक व ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतल रूग्णालयाची तोडफोड केली. तसेच ग्रमस्थानी यावेळी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच त्या युवतीचा मृत्यू झाल्याचा आरोप केला. तर मृतदेह थेट रुग्णालयाच्या दारात ठेवत संताप व्यक्त केला. यावेळी येथे तणाव वाढल्याने पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. तसेच दंगलनियंत्रक पथकालाही पाचारण करण्यात आले होते. यादरम्यान या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री नितेश राणे यांनी मोबाईलवरून मृत युवतीच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. यानंतर येथील तणाव आता निवळला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कासार्डे तरळे येथील कस्तुरी चंद्रकांत पाताडे (वय १९) ही युवती नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. तिच्या डोक्याच्या मागील बाजूला गाठ आली होती. दोन तासात किरकोळ ऑपरेशन करण्यात आले होते. तसेच यानंतर ती घरी जाऊ शकते अशी हमी नागवेकर खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी दिले होती. पण ऑपरेशननंतर कस्तुरीची प्रकृती बिघडली. तिला रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या. यामुळे तिला अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथील खासगी रूग्णालयात पाठविण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असतानाच रविवारी पहाटे तिचा मृत्यू झाला.
यानंतर कणकवली येथे त्या खासगी रुग्णालयाबाहेर नातेवाईक व ग्रामस्थांनी आक्रमक होत डॉक्टरांच्या केबिनला घेराव घातला. तसेच कस्तुरीचा मृतदेह थेट रुग्णालयाच्या दारात ठेवला. यामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तब्बत हजारांचा समुह जमला होता. यामुळे पोलीस बंदोबस्त वाढविण्यासह दंगलनियंत्रक पथकालाही पाचारण करण्यात आले होते.
यावेळी नातेवाईक व ग्रामस्थांनी जर या रुग्णालयात योग्य उपचार शक्य नव्हते, तर सुरुवातीलाच तिला दुसऱ्या रुग्णालयात पाठवायला हवे होते. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतरच कोल्हापूरला हलविण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे कस्तुरीचा हकनाक बळी गेल्याचा आरोप केला आहे. तसेच कोणत्याही आवश्यक चाचण्या न करता शस्त्रक्रिया करण्यात आल्याचाही आरोप केला आहे. यानंतर येथे प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
यादरम्यान या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री नितेश राणे यांनी मोबाईलवरून मृत युवतीच्या नातेवाईकांशी संवाद साधला. त्यांची समजूत काढली. यानंतर येथील तणाव आता निवळला असून नातेवाईक व ग्रामस्थांनी केलेल्या तोडफोडीबाबत पोलिसांत तक्रार दाखल न करण्याचा निर्णय रूग्णालयाने घेतला आहे.
तसेच कस्तुरीच्या मृत्यूबाबत आम्हीही शोकमग्न आहोत अशी प्रतिक्रिया डॉ. अनंत नागवेकर यांनी दिली आहे. यानंतर युवतीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रूग्णालय कणकवली येथे पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच युवतीच्या मृत्यूचे नेमके कारण समजणार आहे.
1. कणकवलीत रुग्णालयाची तोडफोड का झाली?
उपचारादरम्यान युवतीचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा आरोप करण्यात आला.
2. आंदोलनादरम्यान काय प्रकार घडले?
मृतदेह थेट रुग्णालयाच्या दारात ठेवून संताप व्यक्त करण्यात आला.
3. पोलीस प्रशासनाने काय उपाययोजना केल्या?
अतिरिक्त पोलीस बंदोबस्त आणि दंगलनियंत्रक पथक तैनात करण्यात आले.
4. नितेश राणेंची भूमिका काय होती?
पालकमंत्री नितेश राणेंनी मृत युवतीच्या नातेवाईकांशी थेट संपर्क साधला.
5. सध्या कणकवलीतील परिस्थिती कशी आहे?
प्रशासन व राजकीय हस्तक्षेपानंतर तणाव नियंत्रणात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.