

- शिवप्रसाद देसाई
Sindhudurg Election Result : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पालकमंत्री नितेश राणे आणि माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना त्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये धक्के बसले आहेत. राणे यांनी कणकवली येथे सत्ता राखली तरी नगराध्यक्षपद मात्र गमावले. केसरकर यांचे होमग्राऊंड असलेल्या सावंतवाडीसह त्यांच्या मतदारसंघातील वेंगुर्ले येथे शिवसेनेला पराभव पत्कारावा लागला आहे. याचवेळी प्रचारात केंद्रबिंदू ठरलेले आमदार निलेश राणे यांनी त्यांच्या मतदारसंघातील मालवणमध्ये सत्ता राखली आहे.
सिंधुदुर्गात सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण या नगरपरिषदा आणि कणकवली नगरपंचायतीसाठी आज मतमोजणी झाली. चारही ठिकाणचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. यात जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांना धक्के बसले आहेत.
शिवसेनेचे आमदार केसरकर यांना भाजपने त्यांच्या सावंतवाडी मतदारसंघात 2 ठिकाणी पराभव दाखवला. सावंतवाडी हे त्यांचे होमग्राऊंड आहे. दिर्घकाळ या शहरावर केसरकर यांचा करिश्मा राहिला आहे. गेल्यावेळी झालेली पोटनिवडणूक याला काहीशी अपवाद म्हणता येईल. यावेळी येथील पालिकेसाठी भाजप विरूध्द शिवसेना असा थेट मुकाबला झाला. भाजपने दिर्घकाळानंतर राज घराण्याला राजकारणात आणत केसरकरांसमोर आव्हान उभे केले होते. युवराज्ञी श्रध्दाराजे भोसले यांनी प्रचारात चांगली वातावरण निर्मिती केली होती.
त्यामुळे भाजप विरूध्द केसरकर यापेक्षा राजघराणे विरूध्द केसरकर असे चित्र निर्माण झाले होते. येथे भोसले यांनी चांगल्या मताधिक्यासह विजय मिळवला आहे. भाजपने 11 नगरसेवक पदांसह सत्ता मिळवली असून केसरकरांच्या शिवसेनेला 7, ठाकरे शिवसेनेला आणि काँग्रेसला प्रत्येकी 1 नगरसेवक पद मिळाले.
केसरकर यांच्याच मतदारसंघात असलेल्या वेंगुर्लेमध्येसुध्दा भाजपने जोरदार मुसंडी मारली. तेथे नगराध्यक्षपदी भाजपचे दिलीप गिरप 430 मतांनी विजयी झाले असून 20 पैकी 15 नगरसेवक पदे या पक्षाकडे आली आहेत. येथे शिवसेनेला अवघी 1 जागा तर ठाकरे शिवसेनेने 4 नगरसेवक पदे मिळवली आहेत. या रणनितीत पालकमंत्री नितेश राणे यांची भाजपसाठीची भुमिका महत्त्वाची ठरली. केसरकरांसाठी मात्र हा मोठा पराभव म्हणावा लागेल. सावंतवाडीसह येथेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार सभा झाली होती.
कणकवलीत पालकमंत्री नितेश राणे यांच्या विरोधात सगळ्या पक्षांनी एकत्र येत शहर विकास आघाडी स्थापन केली होती. विशेष म्हणजे दोन्ही शिवसेना येथे भाजपच्या विरोधात एकवटल्या होत्या. आमदार निलेश राणे हेही शहर विकास आघाडीच्या बाजूने प्रचारात होते. येथे भाजपने 9 जागांसह सत्ता मिळवली. शहर विकासला 8 नगरसेवकपदे मिळाली. नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत शहर विकासचे संदेश पारकर हे 145 मतांनी विजयी झाले. पालकमंत्री राणे यांच्यासाठी त्यांच्याच बालेकिल्ल्यात बसलेला हा धक्का म्हणावा लागेल.
पैसे वाटपाच्या भाजप (BJP) विरोधातील स्ट्रिंग ऑपरेशनमुळे या नगरपालिकेच्या निवडणुकीत आमदार निलेश राणे देशस्तरावर प्रचाराचे केंद्रबिंदू बनले होते. ज्या शहरात हे स्ट्रिंग ऑपरेशन झाले ते मालवण निलेश राणे यांच्याच विधानसभा मतदारसंघात येते. त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा येथे पणाला लागली होती. त्यांनी मालवण पालिकेतील सत्ता शिवसेनेकडे मिळवण्यात यश मिळवले आहे. येथे शिवसेनेला 10 नगरसेवक पदे आणि ममता वराडकर यांच्या रुपाने नगराध्यक्षपदही मिळाले आहे. येथे भाजपला 5, ठाकरे शिवसेनेला 4 तर अपक्ष 1 नगरसेवक निवडून आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.