

Maharashtra Local Body Election : मागील सुमारे पाच वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायती निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया 2 डिसेंबर आणि 20 डिसेंबर रोजी पडली. अनेक नाट्यमय घडामोडी,वादावादी,आरोप-प्रत्यारोप, फोडाफोडी यांनी गाजलेल्या या नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निकालाकडे सर्व राज्याचं लक्ष लागलेलं आहे. आता या निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळपासून सुरूवात झाली आहे. आत्तापर्यंतचे राज्यातील काही मोठे अपडेटस् समोर आले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणका (Local Body Election) महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांसह स्थानिक आघाड्या व युती यांनीही प्रतिष्ठेच्या केल्या आहेत.यातच पुण्यात एक धक्कादायक निकाल पाहायला मिळाला आहे.पुण्यातील वडगाव नगरपंचायतीत अवघ्या एका मतानं विजय मिळवला आहे.वडगाव नगरपंचायतीत सुनीता राहुल ढोरे या एका मताने विजयी झाल्या आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील 10 नगरपालिका आणि 3 नगरपंचायत निवडणुकीतही अनपेक्षित निकालांनी राजकारणाला धक्का दिला.शिरोळमध्ये आमदार अशोकराव माने यांच्या घराणेशाहीला मतदारांनी सपशेल नाकारलं आहे. माने यांची सून सारिका अरविंद माने यांचा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत तर चिरंजीव अरविंद यांना नगरसेवकपदाच्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे त्यांच्या पुतण्यालाही मतदारांनी पराभवाचा धक्का दिला.
भगूर नगरपरिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेनेची तब्बल 25 वर्षांची सत्ता संपुष्टात आणली आहे.हाती आलेल्या निकालानुसार भगूर नगरपरिषदेत एकूण 17 जागांवर अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप,तर ३ जागांवर एकनाथ शिंदेंची शिवसेना विजयी झाल्याची माहिती मिळत आहे.
करमाळा नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या निकालात भाजपला मोठा धक्का बसला आहे.या निवडणुकीत करमाळा शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मोहिनी संजय सावंत यांनी विजय मिळवला आहे.
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव नगरपरिषद निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं जोरदार मुसंडी मारली आहे. आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं नांदगावचा गड कायम राखत एकहाती सत्ता मिळवली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का देत या निवडणुकीत शिवसेनेचे सर्व नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी झाले आहेत.
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांची बहीण उर्मिला केंद्रे या गंगाखेडमधून नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात होत्या. धनंजय मुंडेंनी स्वत:प्रचारात उतरत बहीण केंद्रे यांच्या विजयासाठी कंबर कसली होती.अखेर धनंजय मुंडे यांची ही मेहनत फळाला आली असून केंद्रे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत.
जेजुरी नगरपरिषदेत माजी आमदार संजयकाका जगताप यांच्या वर्चस्वाला मोठा धक्का बसला असून तिथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयदीप बारभाई विजयी झाले आहेत. तसेच या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 17 उमेदवार विजयी उमेदवार विजयी झाले आहे. भाजपाचे दोन तर अपक्ष उमेदवार तानाजी खोमणे यांनी विजय संपादन केला आहे.
पुणे जिल्ह्यातील इंदापुर निवडणुकीत दत्तामामा भरणेंनी आपली ताकद दाखवून देत राष्ट्रवादी काँग्रेसचे 15 उमेदवार निवडून आणले आहेत. इंदापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार भरत शहा विजयी झाले आहेत. तर बंडखोरी केलेल्या प्रदीप गारटकरांचा पराभव झाला आहे. भरणेंनी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील तसेच भाजपचे नेते प्रवीण माने यांनाही धक्का दिला आहे. इंदापूरमध्ये कृष्णा भीमा विकास आघाडीचे पाच उमेदवार विजयी झाले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे मैदानात उतरल्यानं भोर नगरपालिकेची निवडणूक चर्चेचा विषय ठरली होती. भाजप प्रवेशानंतर संग्राम थोपटे यांची ही पहिलीच निवडणूक होती. पण या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. या निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असलेले रामचंद्र आवारे हे 170 मतांनी विजयी झाले आहेत.
विदर्भातील रामटेक लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे खासदार श्यामकुमार बर्वे यांना त्यांच्याच गावातील नगर पंचायत गमावण्याची नामुष्की ओढावली आहे.बर्वेंचं मूळ गाव असलेल्या कन्हान कांद्री नगर पंचायतमध्ये काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाला.येथून भाजपचे नगराध्यक्षाचे उमेदवार सुजित पानतावने यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे.
मालवण नगरपालिकेवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या ममता वराडकर विजयी झाल्या आहेत. मालवण पालिकेवर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे वर्चस्व राहिले असून त्यांचे 9, भाजप 6उद्धव ठाकरेंची शिवसेना 4 तर एका अपक्षाने विजय मिळवला आहे.
सावंतवाडी नगरपरिषदेवर भाजपची सत्ता आली आहे.नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रद्धा भोसले विजयी झाल्या आहेत. या निवडणुकीत भाजपचे 11, शिवसेना शिंदे गट 7, उद्धव ठाकरे शिवसेना 1 तर काँग्रेसचे 1 नगरसेवक पदाचे उमेदवार विजयी झाले आहेत.
राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळांचा येवला हा मतदारसंघ आहे. त्यामुळे येवला नगरपालिका निवडणुकीत भुजबळांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. निवडणुकीच्या दरम्यान भुजबळ आजारी असल्याने हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते.पण त्यांनी हॉस्पिटलमधूनच प्रचाराची रणनीती आखत येवल्याचा गड राखला आहे. राष्ट्रवादी-भाजप युतीचे उमेदवार राजेंद्र लोणारी हे 1100 मतांनी विजयी झाले असून त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेने उमेदवार रुपेश दराडेंचा पराभव केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.