

सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीतील भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जागावाटपावरून वाद चिघळला आहे.
महायुती संदर्भातील बैठक दुसऱ्यांदा रद्द झाल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती त्याचबरोबर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपमध्ये वाद रंगला आहे. भाजप नेते तथा मंत्री नितेश राणे यांनी महायुतीशी फारकत घेत स्वबळाचा नारा दिला आहे. तर सहसंपर्कमंत्री तथा शिवसेना नेते उदय सामंत यांनी देखील भाजपला थेट इशारा देत जे येथे होईल तेच रत्नागिरीत होईल असे सांगत महायुती म्हणून शिवसेना लढण्यास तयार असल्याचे म्हटले होते. तर आमदार निलेश राणे यांनी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती त्याचबरोबर नगरपरिषदेवर भगवाच फडकेल तर नारायण राणेंच्या विचाराचा सभापती आणि नगराध्यक्ष होईल असे सांगत शिवसेनेचे भूमीका स्पष्ट केली होती. यामुळे येथे महायुती तुटल्याची चर्चा सुरू झाली होती.
यावरून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी महायुती करायची की नाही, याबाबतचा निर्णय मुंबईत भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत होणार होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री उदय सामंत, माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि आमदार नीलेश राणे यांच्यात ही बैठक होणार होती.
मात्र शनिवारी (ता.1) ती झाली नाही. त्यानंतर ती आज तिसऱ्या दिवशीही होऊ शकलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील महायुतीचा मुहूर्त काहीसा लांबल्याचे बोलले जात आहे. शनिवारी होणाऱ्या बैठकीकडे अनेक इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागून होते. मात्र, ती होऊ न शकल्याने जिल्ह्यात महायुती होणार की नाही? असा संभ्रम आता निर्माण झाला आहे.
दरम्यान या संदर्भात केसरकरांनी माहिती देताना, आम्ही वाटाघाटीसाठीही तयार असून नेते जो निर्णय घेतील तो मान्य असेल, असे त्यांनी म्हटले होते. पण ती बैठक गेल्या दुसऱ्यांदा रद्द झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील भाजप, तसेच शिंदेंची शिवसेनेतील इच्छुक उमेदवारांचा जीव सध्या टांगणीला लागला आहे. तर महायुती संदर्भात आता काहीसा संभ्रम पाहायला मिळत आहे.
आमदार केसरकर यांनी कालची बैठक काही कारणास्तव होऊ शकली नाही ती आज होणार, असे सांगितले होते. मात्र, आज उशिरापर्यंत यासंदर्भात काहीच हालचाली दिसून न आल्याने या बैठकीचा मुहूर्त पुढे ढकलण्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात महायुती होणार की नाही? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. जिल्ह्याचा विचार करता भाजप आणि शिंदे शिवसेना यांची ताकद जास्त पाहायला मिळते. एकीकडे मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याच्या घोषणा करण्यात येत होत्या.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघांमध्ये या पार्श्वभूमीवर भाजपमधून शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेशही पार पडले होते. शिवाय काहीजण शिंदे शिवसेनेमध्ये येण्यासही इच्छुक आहेत. युती झाल्यास पक्षप्रवेशासाठी उंबरठ्यावर उभे असलेल्यांना अडवून ठेवण्यात येणार नसल्याचाही सूचक इशारा केसरकरांनी दिला होता. त्यामुळे बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. आता ही बैठक नेमकी कधी पार पडणार? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
1. सिंधुदुर्गमध्ये कोणत्या पक्षांमध्ये वाद सुरू आहे?
भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यात वाद सुरू आहे.
2. हा वाद कशावरून निर्माण झाला?
जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकांसाठी जागावाटपावरून मतभेद झाले आहेत.
3. महायुतीची बैठक का रद्द करण्यात आली?
मतभेद न सुटल्याने आणि एकमत न झाल्याने दुसऱ्यांदा बैठक रद्द करण्यात आली.
4. या वादाचा परिणाम निवडणुकीवर होईल का?
होय, दोन्ही पक्ष स्वतंत्र उमेदवार देऊ शकतात आणि मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यता आहे.
5. राष्ट्रवादी काँग्रेस या वादात काय भूमिका घेत आहे?
सध्या राष्ट्रवादी पक्ष ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहे आणि परिस्थितीचे निरीक्षण करत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.