

SIR voter list Maharashtra : मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी (SIR) मोहिमेचा फटका मतदारांना कसा बसला आहे, यावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. ठाणे शहराचे काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी त्यांची पत्नी आणि ही प्रक्रिया राबवणाऱ्या नायब तहसीलदार यांच्या आईचे नाव मतदार यादीतून वगळल्याचा दावा केला आहे.
या प्रकारानंतर मतदार आपल्या पत्त्यावर असून देखील त्यांचे नाव मतदार यादीतून वगळली गेली, असा घणाघात विक्रांत चव्हाण यांनी केला.
काँग्रेसचे (Congress) ठाण्यातील माजी शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी, ठाण्यातील एसआयआर मोहिमेच्या गंभीर त्रुटींवर बोट ठेवले. ही मोहीम पारदर्शकपणे न राबवता अनेक ठिकाणी बीएलओंनी प्रत्यक्ष घरोघरी न जाता घरबसल्या सर्वेक्षण केल्याचा दावा त्यांनी केला. ओवळा-माजिवडा मतदारसंघात सुमारे साडेतीन लाख, तर कळवा-मुंब्रा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात नावे वगळण्यात आली आहेत.
ठाण्याचे निवासी नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांच्या 80 वर्षीय मातोश्री वत्सला बाबूलाल पैठणकर यांनी अर्ज भरूनही त्यांचे नाव प्रारूप मतदार यादीतून (Voter List) वगळण्यात आले, असा दावा विक्रांत चव्हाण यांनी केला. तसेच चव्हाण यांच्या पत्नी पत्नी अरुणा विक्रांत चव्हाण यांचेही मतदार यादीत असलेले नाव एसआयआर प्रक्रियेनंतर वगळल्याचे त्यांनी उघड केले.
एसआयआर प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप करीत चव्हाण यांनी निवडणूक विभाग व जिल्हा प्रशासनाकडे चौकशीची मागणी केली आहे. ठाण्यात राबविण्यात आलेल्या एसआयआर प्रक्रियेच्या नावाखाली मतदार यादीतील नावे वगळताना प्रत्यक्ष पडताळणी कितपत झाली, संबंधित मतदारांना त्यांची नावे वगळण्यात आल्याची माहिती देण्यात आली का, याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. ही केवळ प्रशासकीय चूक नसून नागरिकांच्या मतदानाच्या अधिकाराशी संबंधित गंभीर बाब आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एसआयआर प्रक्रियेच्या चौकशीची मागणी जिल्हाधिकारी तसेच मुख्य निवडणूक आयोगाकडे करण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. या प्रकरणाची योग्य दखल घेतली नाही, तर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला. तसेच ठाण्यातील एसआयआर प्रक्रियेची स्वतंत्र चौकशी करून वगळण्यात आलेल्या प्रत्येक नावाची फेरपडताळणी करावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.