चिपळूण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाने बंड केल्यानंतर चिपळुणात कोणत्याही बड्या लोकप्रतिनिधीने पक्षांतर्गत बैठकीत अथवा जाहीरपणे नाराजी व्यक्त केली नाही. मात्र, माजी आमदार सदानंद चव्हाण (Sadanand Chavan) यांनी पक्षश्रेष्ठींविषयी नाराजीची तोफ डागली आहे. परिणामी चव्हाण समर्थकांमध्ये गटबाजीच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यानुसार येत्या तीन-चार दिवसांत शिवसेनेत (Shiv Sena) राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यात गेल्या काही दिवसापासून शिवसेनेत ठाकरे विरुद्ध शिंदे गट असा सत्तासंघर्ष सुरू आहे. पक्षाचे चिन्ह व आमदारांच्या अपात्रतेविषयी न्यायालयामध्ये सुनावणी सुरु आहे. एकीकडे हा संघर्ष सुरू असताना शिवसैनिकांमध्ये मोठी दुफळी निर्माण होत आहे. यातून त्या-त्या ठिकाणी पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नवा संघर्ष पाहायला मिळत आहे. चिपळूणचे शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याप्रती २२ जुलै २०२१ च्या महापुरातील मदतीसाठी कृतज्ञता व्यक्त केली.
यानिमित्त उभारलेल्या फलकावरून शिवसेनेतच मोठे बॅनर युद्ध रंगले आहे. या वादातून शिवसेनेत उभी फूट पडल्याची चर्चा होती. अशातच आता नव्या वादाला सुरवात झाल्याची चिन्हे दिसू लागली आहे. आतापर्यंत चिपळुणातील शिवसेनेत पक्ष व नेतृत्वाविषयी उघडपणे नाराजी कोणी व्यक्त केली नव्हती. मात्र, माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी शुक्रवारी झालेल्या बैठकीत आपली नाराजी उघड केली. वरिष्ठ पातळीवर घेतल्या जात असलेल्या निर्णयावरच त्यांनी आक्षेप घेत नाराजीला वाट करुन दिली. एवढेच नव्हे तर अडीच वर्षात पक्षाने बळ दिले नसल्याची खंत मांडली. त्यांच्या या भूमिकेला तालुक्यातील बहुतांशी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे पाठबळ मिळू लागले आहे.
एकनाथ शिंदे गटाने बंड केल्यानंतर चिपळुणात झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत माजी आमदार चव्हाण यांना काहींसे चिमटे काढण्यात आले होते. त्यातच शुक्रवारच्या बैठकीत चव्हाणांना फूल देऊन साधे स्वागतदेखील झाले नाही. याचे शल्य चव्हाण समर्थकांमध्ये आहे. या नाराजीतून काही प्रमुख चव्हाण समर्थकांनी आज पुन्हा बैठक घेत चर्चा केली आहे. पक्षात होणाऱ्या अन्यायाबाबत चव्हाण समर्थकांचे मनसुबे पक्के झाले आहेत.
त्यावर शिक्कामोर्तब होण्यासाठी पुढील दोन-तीन दिवसात बैठक घेतली जाणार आहे. चव्हाणांच्या सोबत कोण, कोण असेल, यांचीही पडताळणी झाली असल्याचे समजते. सदानंद चव्हाण यांना पक्षाने दोनवेळा आमदार केले. आमदारकीसाठी तिसऱ्यांदा संधीदेखील दिली. त्यामुळे पक्षाने त्यांना पुरेपुर संधी दिली. गेल्या अडीच वर्षात त्यांना बळ मिळाले नाही, ही वैयक्तिक बाब असावी. आम्हीही विधानसभेसाठी चांगली तयारी केली. संधी मिळाली नाही, कधी नाराज झालो नाही. पक्षाचा आदेश मानून काम करत राहिलो. पक्षामुळे ओळख आहे, हे कोणी विसरू नये, असे शिवसेनेचे रत्नागिरी उत्तरचे जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.