Ratnagiri News: लोकसभेची निवडणूक अगदी तोंडावर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोकणात सभा आणि मेळाव्यांचा धडाका लावला आहे. आज रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमध्ये त्यांची पहिली सभा झाली. (Uddhav Thackeray Konkan Visit )
या सभेत उद्धव ठाकरे यांनी आमदार राजन साळवी यांच्यावर एसीबीने केलेल्या कारवाईवरून जोरदार निशाणा साधला. तसेच दिवस बदलतात, दुर्दैवाने आज त्यांचे दिवस, उद्या आमचेही येतील, तेव्हा सोडणार नाही, अशा शब्दात ठाकरेंनी अधिकाऱ्यांना सुनावलं. तर भाजपालाही इशारा दिला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
'ते तुमच्याकडे येत नाहीत, त्याच्यांवर तुम्ही दडपण आणतात. पण तुम्ही किती काही केले तरी हा मर्द मावळा झुकणार नाही', अशा शब्दात ठाकरेंनी आमदार साळवींचं कौतुक केलं. तसेच मोडेल पण वाकणार नाही पण तुम्हाला मोडून ठेवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
राजन साळवी यांच्याबाबत कोणी तक्रार केली. त्यांच्या घरी काय सापडलं ? असा सवाल करत राजापूरमधील इच्छुक उमेदवार जे काही खर्च करत आहेत, त्यांच्या घरी पहिल्यांदा धाड टाका, असं आव्हान ठाकरेंनी एसीबीला दिलं. त्यांचे भाऊ पण आहेत पलीकडे या सगळ्यांच्या संपत्तीची चौकशी करा, ते प्रत्येक गोष्टीतून पैसा काढत आहेत, त्यांची अगोदर चौकशी करा, अशा शब्दात ठाकरेंनी नाव न घेता सामंत बंधूंवरही निशाणा साधला.
एसीबीचे अधिकारी सुशांत चव्हाण यांच्यावरही ठाकरेंनी जोरदार टीका केली. महाराजांच्या मूर्तीची किंमत तुम्ही पाच हजार रुपये करता, तुम्हाला लाज वाटत नाही का ? अहो तुमची किंमत किती ? असं सांगत 'एसीबी'च्या अधिकाऱ्यांवर ठाकरेंनी शरसंधान साधलं.
लांडग्यासारखी जर का कोणाची लाचारी करणार असाल तर सत्ता बदलल्यानंतर तुमची लांडगेगिरी काय आहे ? कोल्हेगिरी काय आहे ?, आम्ही सरळ केल्याशिवाय राहणार नाही, अशा कडक शब्दात उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला. आता माझं तर म्हणणं आहे तुम्ही काय किंमत लावायची ती लावा आणि राजन साळवी यांना आतमध्ये टाका, अहो तुमच्या घरातल्या आई-वडिलांची किंमत कोणी केली तर चव्हाण साहेब तुम्हाला चालेल का ? त्यामुळे मी यंत्रणेतील सर्व अधिकाऱ्यांना सांगतोय दिवस बदलत असतात, दुर्दैवाने आज त्यांचे दिवस आहेत. उद्या आमचेही दिवस येतील तेव्हा लक्षात ठेवा, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
(Edited By-Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.