

Sindhudurg News : कुडाळ-मालवणच्या राजकारणात माजी आमदार वैभव नाईक आणि विद्यमान आमदार नीलेश राणे यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा पेटला आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी वैभव नाईक हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार होते, असा गौप्यस्फोट नीलेश राणे यांनी केला आहे. “सगळं ठरलं होतं. एबी फॉर्म घेऊन धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवणार होते,” असा दावा राणेंनी केला.
नीलेश राणेंच्या या दाव्यानंतर तळकोकणातील राजकीय वातावरण तापले आहे. वैभव नाईक यांनीही राणेंच्या आरोपाला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “ठाकरेंशी गद्दारी करून मला आमदार व्हायचं नव्हतं. गद्दारकीचा कलंक नको होता,” असे म्हणत नाईकांनी शिंदे गटात प्रवेश न करण्यामागची भूमिका स्पष्ट केली.
‘एबी फॉर्म घेणार, धनुष्यबाणावर लढणार; सगळं ठरलं होतं’
एका कार्यक्रमात बोलताना नीलेश राणे यांनी वैभव नाईक यांच्या कथित शिंदे कनेक्शनचा दावा केला. 2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी नाईक हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार होते. त्यांच्यासोबत निवडणुकीबाबत सर्व बोलणी झाल्याचे राणेंनी सांगितले.
“ते आमच्या शिवसेनेकडून लढायला तयार होते. त्यासाठी येथे अँटीचेंबरमध्ये येऊन बसायचे. सगळ्यांचा संपर्क होता. सगळे बोलायचे. ते फक्त येणार, एबी फॉर्म घेणार आणि शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवणार, इथपर्यंत सगळं झालं होतं,” असा दावा नीलेश राणेंनी केला. राणेंच्या या दाव्यामुळे 2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पडद्यामागे नेमक्या कोणत्या राजकीय हालचाली सुरू होत्या, याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
‘शिंदेंनी अनेकदा बोलावलं, पण मी गेलो नाही’
नीलेश राणेंच्या आरोपावर वैभव नाईक यांनी आपली बाजू स्पष्ट केली. एकनाथ शिंदे यांनी आपल्याला अनेकवेळा संपर्क करून सोबत येण्याचे निमंत्रण दिले होते, अशी माहिती नाईकांनी दिली. मात्र, उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात जाणे त्यांनी नाकारले. “एकनाथ शिंदे यांनी मला अनेकवेळा बोलावले होते. पण ठाकरेंशी गद्दारी करून मला आमदार व्हायचे नव्हते. म्हणून मी शिंदेंसोबत गेलो नाही,” असे वैभव नाईक यांनी म्हटले.
यावेळी त्यांनी मंत्री भरत गोगावले यांचाही उल्लेख केला. गोगावले यांनीदेखील शिंदे यांच्या शिवसेनेत येण्यासाठी आपल्याशी संपर्क साधला होता, असा दावा नाईकांनी केला. मात्र, “मला गद्दारकीचा कलंक नको होता,” असे म्हणत आपण तो प्रस्ताव स्वीकारला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘आमदारकीसाठी राणेंनी भाजप सोडला’
वैभव नाईक यांनी याच मुद्द्यावरून नीलेश राणेंवरही पलटवार केला. “आमदारकीसाठी नीलेश राणे यांनीच भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला,” असा आरोप नाईकांनी केला. इतकेच नाही तर आगामी काळात नीलेश राणे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करून कुडाळमधून निवडणूक लढवतील, असा दावाही वैभव नाईक यांनी केला आहे.
त्यामुळे कुडाळ-मालवणच्या राजकारणात आता केवळ आरोप-प्रत्यारोप सुरू नसून, 2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या पडद्यामागील राजकीय हालचालींचीही चर्चा रंगली आहे. नीलेश राणेंच्या गौप्यस्फोटाला वैभव नाईकांनी दिलेल्या पलटवारामुळे तळकोकणातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.